नाशिक :भाजप शिवसेनायुतीमध्ये 2014 मध्ये जागा वाटप हा एक मुद्दा होता. 171 जागेवर शिवसेना लढत होती. भाजपचे वातावरण देशात होते म्हणून अधिकच्या जागा मिळाव्या यासाठी युती तोडली. आपली सत्ता येईल असा विश्वास भाजपला वाटत होता; म्हणून युती तोडली असावी, असे मलावाटत होते. यापेक्षा पक्षाला काय वाटत होते हे महत्त्वाचे होते; पण तेव्हा मला बदनाम केले गेले, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.
ठाकरे, सेनेला टार्गेट केले जातेय :लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्या जिंकायच्या असेल तर शिवसेना आव्हान देऊ शकते. म्हणून शिवसेनेला (ठाकरे) टार्गेट केले जातेय. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्ष फोडला तेव्हा शिंदे आणि भाजप, असे बहुमत होते. तिसऱ्याची आवश्यकता नव्हती. शिंदे अधिक प्रभावी होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले. सिनियर आणि ज्युनिअर उपमुख्यमंत्री केले. जागावाटप हा येणारा काळ ठरवेल, असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
किळसवाणे राजकारण :एवढेकिळसवाणे राजकारण इतिहासात कधीही नव्हते. कोणता नेता कुठे आहे हेच समजत नाही. हेच तिन्ही पक्ष एकमेकांवर टीका करायचे, आता कोणावर टीका करणार असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
सर्वच पक्ष दौरे करत आहेत :प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. आपल्या जागा वाढाव्या, अशी अपेक्षा काँग्रेस करत असली तरी उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी दौरे केले आहेत. शरद पवार यांचेही दौरे झाले आहेत. बीड आणि जळगावला सभा होणार आहे. राज्यातील एकही पक्ष 48 जागा लढवू शकत नाही. निवडणूक तोंडावर असल्याने प्रत्येकजण पक्ष जोडायला लागला आहे. बच्चू कडू यांना देखील जवळ केले. महाविकास आघाडीला राज्यात चांगला प्रतिसाद मिळेल, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.