नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश असून नाशिक जिल्ह्यात विकेंड लॉकडाउनही आहे. तरीही मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी (दि. 18 जुलै) नाशिक जिल्ह्यातील नवश्या गणपतीचे दर्शन घेत विधिवत पूजा केली होती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप आध्यात्मिक आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
सर्वसामान्यांसाठी बंद देवाचे दार, मंत्र्यांच्या हाती मात्र आरतीचे ताट
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारने राज्यभरातील धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय कायम केला आहे. यातच नाशिकमध्येही जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी दुपारी 4 वाजेपासून ते सोमवारी सकाळपर्यंत वीकेंड लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. मात्र, जिल्ह्यात वीकेंड लॉकडाउन लागू असताना मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाशिकच्या नवश्या गणपती मंदिरात जाऊन आरती केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप अध्यात्मिक आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
आव्हाडांवर गुन्हा दाखल करा अन्यथा सर्वसामान्यांसाठी देखील मंदिर खुली करा
पालकमंत्री छगन भुजबळही शुक्रवारी (दि. 16 जुलै) झालेल्या आढावा बैठकीत तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले होते. नियम तोडल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला होता. सर्वसामान्यांसाठी मंदिर बंद ठेवण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना आपल्या आराध्यांचा दर्शन घेता येत नाही. तर दुसरीकडे ज्या शासनाने हे नियम घालून दिलेल्या सरकारमधील मंत्रीच त्या नियमांना हरताळ फासत मंदिरात जाऊन आरती केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोपही भाजप आध्यत्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी केला आहे. दरम्यान, प्रशासनाने लादलेले नियम हे फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. मंत्री आव्हाडांवर गुन्हा दाखल करा करा अन्यथा सर्वसामान्यांसाठीही मंदिर खुली करा, अशी मागणी तुषार भोसले यांच्याकडून करण्यात आली आहे. यामुळे आता त्यांच्या या मागणीची दखल घेत प्रशासनाकडून मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा -मंदिरे केवळ सर्वसामान्यांसाठीच बंद का, भक्तांचा सवाल