सटाणा (नाशिक) - तालुक्यातील वाठोडा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील वग्रीपाडा या आदिवासी लोकवस्तीच्या गावातील 300 कोंबड्यांचा 'बर्ड-फ्ल्यू'ने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर परिसरातील एक किलोमीटरचा परिसर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. पशुसंवर्धन विभाग व बर्ड फ्लू नियंत्रण टीम या गावात दाखल झाली आणि कलिंग ऑपरेशन दरम्यान परिसरातील जवळपास 1 हजार 192 कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत.
बागलाणच्या पश्चिम आदिवासी भागात शेतकरी सुरेश महाले यांनी आर. आर. प्रजातीच्या सुमारे तीनशे कोंबड्या कुकूटपालनाचा व्यवसाय म्हणून आपल्या गावातील घरीच छोट्या शेडमध्ये ठेवल्या होत्या. या कोंबड्याचा अचानक मरू लागल्याने संशयित कोंबड्यांचे नमुने पशुधन अधिकाऱ्यांनी पुणे आणि भोपाळ येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असता या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ आदेश काढत या भागातील एक किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला.