नाशिक- काही दिवसांपूर्वी विकत घेतली नवीन दुचाकी पिकअप घेत नाही (वेगाने धावत नाही) म्हणून, शोरूम मध्येच दुचाकी मालकाच्या भावाने गाडी पेटवल्याची धक्कादायक घटना नाशिक येथे घडली आहे. कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून संशयितास गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण वाघमारे (वय 24 वर्षे) हा भावाने घेतलेली दुचाकी घेऊन नाशिकच्या शिवांग शोरूममध्ये आला होता. काही दिवसांपूर्वीच घेतलेली दुचाकी 80 किमी प्रतितासपेक्षा जास्त वेगाने धावत नाही म्हणून त्याने शोरूम मध्ये तक्रार केली होती. अशात गाडी लवकर दुरुस्त करून देतो, असे मेकॅनिक रमेश निसरगंध याने नारायण यास सांगितले होते. मात्र, नारायणने शोरूमच्या पार्किंग परिसरात उभी असलेल्या दुचाकीच्या पेट्रोलची नळी काढून त्याला आग लावून दिली. त्यानंतर स्वतःच गाडी जळते बघून आरडाओरड करण्यास सुरुवात केली.