नाशिक -शहरापासून अवघ्या ५ किमी अंतरावर विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील तरसाळी फाट्याजवळ सोमवारी दुपारी १२ दरम्यान दुचाकीला अपघात झाल्याची घटना घडली. यात अवघ्या ११ महिन्याच्या चिमुकल्याला जीवदान देऊन मातेने मृत्यूला कवटाळले. निकिता आनंदसिंग ठाकरे (वय ३०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ठाकरे दाम्पत्य आपल्या आजारी चिमुकल्याला उपचारासाठी गणेशपूर ता. साक्री जि. धुळे येथून दुचाकीने सटाणा शहराकडे येत असताना हा अपघात घडला.
गणेशपूर (ता.साक्री जि.धुळे) येथील गोरख आनंदसिंग ठाकरे (वय ३५) हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. गेल्या २ दिवसांपासून त्यांच्या ११ महिन्यांच्या 'आदि' नावाच्या मुलाची तब्येत अचानक बिघली. त्याच्यावर सटाणा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी गोरख ठाकरे यांनी वडील आनंदसिंग ठाकरे यांना रुग्णालयात वेटिंग नंबर लावण्यासाठी रविवारी दुपारी बसने सटाणा येथे पाठवले होते. सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास स्वत: गोरख ठाकरे हे दुचाकीवरून पत्नी निकिता, मुलगा पार्थ (वय ४) व आदी (वय ११ महिने) यांना सोबत घेऊन सटाण्याच्या दिशेने निघाले.
दुपारी १२ च्या सुमारास विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील तरसाळी फाट्याजवळ रस्त्यातील खड्ड्यांमुळे दुचाकीवर आदिला कवेत घेऊन बसलेल्या निकिताचा अचानक तोल गेला. त्या थेट महामार्गावर जोरात पडल्या, याच वेळी गोरख यांचाही दुचाकीवरील ताबा सुटला आणि ते सुद्धा जोरात पडले. या भीषण अपघातात निकिता यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. निकिताच्या डोक्यातून रक्तप्रवाह वाहू लागला मात्र, या परिस्थितीतही त्यांनी चिमुकल्या आदिला घट्ट धरून त्याचा जीव वाचवला. गोरख यांच्या गुडघ्याला गंभीर मार लागल्याने त्यांनाही जागेवरून उठता येत नव्हते. तर, ४ वर्षांच्या पार्थला सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही.