नाशिक- कांद्याचे भाव गडगडले असून ते कांदा 125 रुपयांवरून थेट 15-18 रुपये किलोवर पोहोचले आहेत. हे भाव स्थिर ठेवण्यासाठी निर्यात बंदी उठवण्याची मागणी खासदार भारती पवार यांनी केली आहे. याला महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.
मगील काही दिवसांपासून नांदगांव, मनमाडसह जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात रोज घसरण होत आहे. मंगळवारी कांद्याला प्रती किलो फक्त 15 ते 18 रुपये भाव मिळाला. कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याचे पाहून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
भाव स्थिर ठेवण्यासाठी निर्यात बंदी उठवणे गरजेचे
यासाठी दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.भारती पवार यांनी संसदेच्या बजेट विशेष क्षेत्रात निर्यातबंदी उठवण्याची मागणी केली आहे. शासनाने तातडीने निर्यात बंदी न उठवल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेने दिला आहे. कांद्याचे भाव कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे केंद्र शासनाने तातडीने कांद्याच्या भावाला लगाम लावण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.