नाशिक -जिल्ह्यातील उमराणे गावात सरपंचासह पॅनल बिनविरोध होण्यासाठी तब्बल दोन कोटी पाच लाख रुपयांची बोली लावण्यात आली आहे. या बोलीतील सर्वच रक्कम ही गावातील रामेश्वर मंदिराच्या बांधकामासाठी वापरली जाणार आहे. स्थानिक ग्रामस्थांनी या बोलीत मोठ्या प्रमाणात सहभाग घेत ही निवडणूक बिनविरोध केली. प्रशांत विश्वासराव देवरे यांच्या पॅनलने या बोलीचा मान मिळवला असून या बोलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सरपंचपदासाठी लागली २ कोटींची बोली! १ कोटी ११ लाखांपासून सुरू झालेली बोली थेट २ कोटी ५ लाखांवर...
राज्यात सगळीकडे ग्रामपंचायत 'फिव्हर' सुरू असताना निवडणूक जिंकण्यासाठी इच्छुक उमेदवार वेगवेगळे फंडे लढवताना दिसत आहेत. मात्र देवळा तालुक्यातील उमराणे गावात गावकऱ्यांनीच पुढे येऊन सरपंचासह संपूर्ण निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरवले. पण या बिनविरोध निवडणुकीमागचे रहस्य मात्र वेगळेच होते. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावातील रामेश्वर महाराजांच्या मंदिर बांधकाम उभारणीसाठी बोली लावण्याचे ठरले. जो बोली जिंकेल त्यांचा सरपंच व सदस्य मंडळ पाच वर्षे स्थिर राहील अशी घोषणा करण्यात आली.
सरपंचपदासाठी लागली २ कोटींची बोली! हेही वाचा -ICC पुरस्कारांवर भारताची मोहोर; विराट- धोनीने पटकावले 'हे' पुरस्कार
१ कोटी ११ लाखांपासून सुरू झालेली ही बोली थेट २ कोटी ५ लाखांवर जाऊन थांबली. या बोलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वासतात्या देवरे यांचे सुपुत्र व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रशांत विश्वासराव देवरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने ही बोली जिंकली. ग्रामदैवत असलेल्या रामेश्वर महाराज मंदिराच्या उभारणीसाठी ही देणगी देण्याचे देवरे पॅनलने जाहीर केले. गावकऱ्यांनीही देवरे यांचा पॅनल बिनविरोध निवडला जाईल, असे जाहीर केले आहे.