नाशिक -राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी), नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि देशातील ढासळलेल्या अर्थव्यवस्थेविरोधात भारत मुक्ती मोर्चा (बामसेफ) संविधान बचाव समितीने बुधवार भारत बंदची हाक दिली आहे. त्याला नाशिक जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून नांदगांव आणि मनमाडला कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी बामसेफ आणि सर्वधर्मीय यांच्या तर्फे भव्य निषेध रॅली काढून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
देशात एनआरसी आणि सीएए विरोधात प्रचंड रोष आहे. सरकार दडपशाही करून हा कायदा लागू करू पाहत आहे. दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था तळाला गेली आहे. तर, जीएसटी, नोटबंदी आणि अविश्वासाचे वातावरण यामुळे सरकारला निधी येत नाही. देशाची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू आहे. या सर्वाला सरकार जबाबदार असून त्याचा निषेध करण्यासाठीच भारत बंद करण्यात आला आहे. बामसेफ प्रमुख यांनी डीएनए च्या धर्तीवर एनआरसी लागू करण्याची मागणी केली असून देशभरात आज मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले.
यावेळी 'देश की जनता भूखी है, ये आझादी झूठी है', सारख्या घोषणा देण्यात आल्या. तर, 'जान से प्यारी आझादी' हे गाणे म्हणत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. फुले चौक येथून महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरवात करण्यात आली. नेहरू भवन, सराफा बाजार, शिवाजी चौक, आंबेडकर पुतळामार्गे एकात्मता चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी सर्वांनी आम्ही सर्व भारतीय आहोत कोणी आमच्याकडे पुरावे मागू नये असे आवाहन केले.