मुंबई - मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी बेस्ट गेल्या काही वर्षात आर्थिक अडचणीत सापडली आहे. या बेस्टला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आणि बेस्टला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रवासी वाढवणे आणि प्रवाशांना चांगल्यात चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे प्रवासी बेस्टकडे वळतील आणि बेस्ट आर्थिक अडचणीतून बाहेर येईल, अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.
प्रवासी वाढल्यावर उत्पन्न वाढेल -
बेस्ट उपक्रमाने नुकताच २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा २२०० कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. मुंबई महापालिकेने बेस्टला ३५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. त्यानंतरही बेस्टची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर कसे काढले जाऊ शकते, याबाबत महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांच्याशी संपर्क साधला असता ते बोलत होते. यावेळी बोलताना, बेस्टची सेवा कशी चांगली करता येईल याकडे लक्ष दिलेले आहे. त्यासाठी जास्तीत जास्त इलेक्ट्रिक बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. पुढील एक ते दीड वर्षात २२०० इलेक्ट्रिक बसेस ताफ्यात येणार आहेत. यामुळे आमचे प्रवासी वाढतील. जसजसे प्रवासी वाढतील त्याप्रमाणे बेस्टचे उत्पन्न वाढून बेस्टचा तोटा कमी होईल, अशी माहिती लोकेश चंद्रा यांनी दिली.
प्रवाशांची संख्या आणि उत्पन्न वाढले -
आम्ही बसच्या मार्गात सुधारणा केली आहे. नवीन मार्गही सुरू केले आहेत. त्याचा फायदा बेस्टला झाला आहे. याआधी २२ ते २३ लाख प्रवासी होते. त्यात वाढ होऊन २८ लाख प्रवासी झाले आहेत. बेस्टला दरदिवशी १ ते दीड कोटी रुपये उत्पन्न मिळत होते. त्यातही वाढ होऊन आता हे उत्पन्न आता २ कोटी २० लाख इतके झाले आहे. याआधी दोन बसमधील अंतर आधी ३० ते ४० मिनिटे इतके होते. ते अंतर कमी करून १५ मिनिटांवर आणले आहे. हे अंतर १० मिनिटे राहील, यासाठी नियोजन केले आहे. तसेच लवकरच मुंबईत सर्वंतर मेट्रो सेवा सुरु होणार आहे. मेट्रो सेवा सुरु झाल्यावर त्यासाठीही फिडर मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती महाव्यवस्थापकांनी दिली.
हेही वाचा -आगींच्या घटनांनंतर सरकारने काय खबरदारी घेतली हे जनतेला कळू द्या - प्रविण दरेकर