महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये शेतकऱ्यांना 1639 कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप- जिल्हाधिकारी सुरज मांढरे - पीक कर्ज वाटप

जिल्ह्यातील विविध बँकांद्वारे शेतकऱ्यांना आतापर्यंत 1 हजार 639 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 156 कोटी रुपये अधिकचे कर्ज वाटप झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज विविध बँक अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

nashik crop loan
नाशिक जिल्हा पीक कर्ज वाटप

By

Published : Aug 27, 2020, 3:27 PM IST

नाशिक-जिल्ह्यातीलशेतकऱ्यांना आतापर्यंत 1 हजार 639 कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 156 कोटी रुपयांचे अधिकचे कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक, व्यापारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते.

पीक कर्ज वाटपासंदर्भात 12 ऑगस्टला बैठक झाली होती. त्या बैठकीनंतर आतापर्यंत 200 कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप बँकांमार्फत करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात पीक कर्जाचे उद्दिष्ठ 3 हजार 303 कोटी रुपये ठेवण्यात आले होते. त्यापैकी 2 हजार 400 कोटी कर्जाचे वाटप करण्याची जबाबदारी 10 बँकांकडे आहे. 12 ऑगस्टला झालेल्या बैठकीत बँक ऑफ महाराष्ट्राने 271 कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप केल्याची माहिती दिली होती. आतापर्यंत बॅंकेने 318 कोटी रुपयांपर्यंत वाटप केले आहे. आजपर्यंत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 270 कोटी, बँक ऑफ बडोदा 263 कोटी, बँक ऑफ इंडिया 66 कोटी, युनियन बँक ऑफ इंडिया 112 कोटी, स्टेट बँक ऑफ इंडिया 265 कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 74 कोटी तसेच एचडीएफसी 3 कोटी व कोटक महिंद्रा 6 कोटी कर्जाचे वाटप केले आहे.

मागील 10 ते 12 दिवसात शेतकऱ्यांना साधारण 250 ते 300 कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. इगतपुरी व जिल्ह्याच्या पश्चिम भागात भात, द्राक्ष आदी पिकांची लागवड उशिराने होत असल्याने उर्वरित पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट महिनाअखेर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी बँकांना दिल्या आहेत.

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 176 कोटींचे कर्ज वाटप....

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जुलै महिन्याच्या मध्यावधीपर्यंत 1 हजार 267 कोटी प्राप्त उद्दिष्टापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांना 176 कोटींच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत कर्ज वाटप करताना शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही यासाठी एनडीसीसी बँकेने विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिले आहेत.

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत उशिराने रक्कम मिळाली असूनही जिल्ह्यात 34 टक्के इतके कर्ज वाटप करण्यात आले आहे. हे प्रमाण उद्दिष्ठापर्यंत जाण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील बँकांनी पीककर्ज वाटपासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत, अशाही सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details