नाशिक- बांबू हा एक उपयुक्त आणि सर्वसमावेशक घटक म्हणून ओळखला जातो. आजवर आपण बांबूचा वापर कच्ची घरे शोभेच्या वस्तू टोपल्या किंवा बांधकाम व्यवसायामध्ये आधार देण्यासाठी केला जात असल्याचे पाहिले आहे. मात्र आता बांबूचा वापर हा आधुनिक बांधकामे करण्यासाठी देखील होणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने बांधकाम दर सूचीमध्ये बांबूच्या बारा घटकांची सूची मान्य केली आहे. यामुळे आता बांबूचा वापर बांधकामांमध्ये होणार असल्याने येत्या काळात बांधकामही पर्यावरण पूरक आणि कमी खर्चात होणार आहेत. या क्षेत्रातील तज्ञ हे मुक्त विद्यापीठामध्ये देखील असल्याने बांबूच्या एका पथदर्शक बांधकामाचा नमुना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने निर्माण करण्यात आला आहे.
पर्यावरण पूरक आणि कमी खर्चात होणार बांधकाम
बांबूचे छत, बांबूचे कॉलम यांची निर्मिती करून काँक्रीटचे अच्छादन असलेले पार्टिशन, भिंत असे मजबूत बांधकाम असलेले शेतकरी माहिती केंद्र सभागृह नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ परिसरात उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात कुठल्याही बीड किंवा सिमेंटचा वापर केला गेला नाही. संपूर्ण बांधकाम हे बांबूच्या आधारावर करण्यात आले आहे. यामुळे हे सभागृह आता जिल्हाभरात कुतूहलाचा विषय ठरत आहे. तसेच येत्या काळात बांबूपासून गृह निर्मिती करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.