मोटारसायकलवर योगासने आणि सूर्यनमस्कार करणारा अवलिया नाशिक :योगासने आणि सूर्यनमस्कार जमिनीवरच केली जातात असे नाही. नाशिकमधील अवलिया योगशिक्षक बाळू मोकल यांना दुचाकीवर योगासने करण्याचा छंद लागला. त्यातून त्यांनी एका नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अवघ्या अर्ध्या तासात 51 योगासने आणि सूर्यनमस्कार आपल्या दुचाकीवर केले. यामुळे त्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यांच्या या अनोख्या विक्रमामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दुचाकीवर योगासने करण्याचा छंद : नाशिकरोड भागात राहणारे बाळू मोकल यांना लहानपणापासून व्यायाम, योगासने करण्याची आवड आहे. यातच आपण प्राविण्य मिळवावे, असे त्यांनी ठरवले. त्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण देखील त्यांनी घेतले. योगशिक्षक म्हणून त्यांनी अनेकांना योगासनाचे धडे दिले, अशात मागील कोरोना काळात त्यांना आपल्या दुचाकीवर योगासने करण्याचा छंद लागला. यावर त्यांनी मेहनत घेतली. जमिनीवर योगासने करणे तसे सोपे असले तरी दुचाकीवर अगदी अरुंद जागेत योगासने करायचे म्हटल्यावर अवघड असते. त्याचा अनेक महिने बाळू यांना सराव करावा लागला.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद : अखेर त्यांनी या छंदामुळे विक्रमाला गवसणी घातली. त्यांनी अवघ्या अर्ध्या तासात 51 योगासने आणि सूर्यनमस्कार आपल्या दुचाकीवर केले. यात पद्मासन, वज्रासन, ताडासन, मार्जरी आसन, त्रिकोणासन, हलासन, धनुरासन, शिर्षासन, अकारण धनुरासन, शलभासन, बद्धकोनासन, भुजनगासन, सर्वांगासन, नौकासन असे अनेक आसन आणि सूर्यनमस्कार ते मोटारसायकलवर करतात. याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
योगासने शरीरासाठी फायदेशीर :मी अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना योगासनांचे धडे देत आहेत. माझ्याकडे अनेक मुले शिकत आहेत. योगासने आणि सूर्यनमस्कार यांचा आपल्या शरीरासाठी खूप चांगला फायदा होतो. दररोज आपण नियमित योगासने केली तर आपल्या शरीराला कोणताही आजार जडणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने सकाळी उठून योगासने केली पाहिजे. व्यायाम केला पाहिजे. दुचाकीवर उभे राहून योगासने करणे हे फार जिकरीचे काम आहे. मात्र सातत्य आणि प्रयत्न यामुळे मी हे शक्य करू शकलो, असे बाळू मोकल यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : Droupadi Murmu Odisha Visit : योगाने मला मानसिक आणि शारीरिक त्रासातून बाहेर काढले - राष्ट्रपती मुर्मू