नाशिक -बागलाणचे मान सरोवर म्हणून ओळखले जाणारा 'फुल पगार' हा निसर्ग निर्मित कमळाचा तलाव पर्यटकांना साद घालत आहे. या तलावात पाच ते सहा प्रकारच्या कमळाची फुले फुलतात. हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी परिसरातील हौशी पर्यटक या ठिकाणी आवर्जून भेट देऊन येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत आहेत.
या वर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे झाल्याने प्रसिद्धीपासून दूर असलेले हे ठिकाण वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगाच्या कमळांनी फुलून गेले आहे. कैलासातील मानसरोवर आणि श्रीशैल्यम ही ठिकाणे कमळासाठी प्रसिद्ध आहेत. बागलाण तालुक्यातील हे ठिकाण मान सरोवराची प्रतिकृती मानली जाते. समुद्र सपाटीपासून दोन हजार फूट उंचीवर समतल भागात वीज पडून सुमारे अकराशे वर्षांपूर्वी या तलावाची निर्मिती झाली आहे.
हेही वाचा - मुंबईत चक्क कांद्याची चोरी.. दोन दुकाने फोडून 21 हजारांचा कांदा लांबवला
उन्हाळ्यात हा तलाव कोरडा होतो. पावसाळ्यात मात्र याठिकाणी आपोआप कमळ उगवतात. ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत सोनेरी, पिवळा, पांढरा, गुलाबी, गर्द लाल, जांभळा या रंगांची कमळाची फुले फुलतात. या तलावापासून जवळ गंगा कुंड नावाचा झरा असून, याच्या स्त्रोताविषयी गूढ आहे. या कुंडाचे पाणी औषधी असल्याचे येथील जाणकार सांगतात.
महाभारतात पद्मालय नावाने उल्लेख असलेल्या ठिकाणाशी या तलावाचे साधर्म्य आहे. हनुमानाने भिमाचे गर्वहरण याच ठिकाणी केल्याचे पुरावे येथे आढळतात. सहा डोंगरांदरम्यान हा तलाव वसला आहे. जवळच असलेल्या शेवाळ्या डोंगरावर मोठी मानव निर्मित गुहा असून, येथे लेणी असण्याची शक्यता आहे. पुरातत्व आणि पर्यटन विभागाने लक्ष घातल्यास महाराष्ट्रातील उत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणून हा तलाव नावारूपास येऊ शकते, असे स्थानिक नागरिकांचे म्हणने आहे.
पुराणात नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात सोळा ठिकाणी कमळाचे तलाव असल्याच्या नोंदी आढळतात. त्या पैकी सर्व कमळाचे तलाव नामशेष झाले असून केवळ हाच तलाव आपले अस्तित्व टिकवून आहे.