नाशिक -महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून, एमपीएससी पुर्व परीक्षा घेण्यात आली आहे. शहरातील ४६ केंद्रांवर ११ हजार ७४८ उमेदवारांनी दिली. तर ६ हजार ३२३ जण गैरहजर होते. नाशिकरोड येथील के. जे. महेता विद्यालयातील परीक्षा केंद्रावर कोरोनाची लक्षणे असलेल्या परीक्षार्थीने पीपीई कीट घालून परीक्षा दिली आहे. त्याच्यासाठी स्वतंत्र वर्गखोलीची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच इतर उमेदवारांना देखील मास्क व सॅनिटायर पुरवण्यात आले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे तब्बल दोन वर्षांनंतर आणि चार वेळा स्थगीत करण्यात आलेली राज्यसेवेची पुर्व परीक्षा रविवारी घेण्यात आली. राजपत्रीत अधिकारी वर्ग अ गटातील पदांसाठी नाशिक शहरातील ४६ केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून परीक्षा पार पडली. सकाळी ८ वाजेपासूनच परीक्षा केंद्रवार उमेदवारांना प्रवेश देण्यात आला. त्यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत पहिला पेपर पार पडला. तर दुपारी ३ ते ५ या वेळेत दुसरा पेपर झाला. पहिल्या सत्राच्या तुलनेत दुसऱ्या सत्रात आणखी ५३ परीक्षार्थींनी दांडी मारली.