नाशिक :नाशिकच्या मुख्य आगारातून आज पोलीस बंदोबस्तात ( Police security at Nashik main depo ) नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या वेग वेगळ्या भागात तब्बल 50 बसेस रवाना करण्यात आल्या आहेत. मात्र या प्रक्रियेला आंदोलक कर्मचाऱ्यांचा विरोध असल्याने बस आगारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या अतिरिक्त बंदोबस्ताने आगाराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. कंत्राटी कर्मचाऱ्याच्या मदतीने सुरू करण्यात आलेली बससेवा ही प्रवाशांच्या जीविताशी खेळणारी आहे, 45 दिवसाची ट्रेंनिग कायम कर्मचाऱ्यांना बंधनकारक असतांना, आज मात्र केवळ 2 दिवसाच ट्रेनिंग देत कंत्राटी कर्मचारयांच्या हातात लाल परी दिली जात आहे. असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
दरम्यान कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरू करण्यात आलेली बससेवा ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच सुरू केली आहे. तसेच ज्यांच्या हातात लाल परी दिली आहे, ते सर्व लोक परवाणा धारक आहेत. त्यांच्या संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय तपासणी देखील झाली आहे. त्यामुळे या आरोपात तथ्य नाही उलट आजही जे कर्मचारी सेवेत दाखल झाले नाही, त्यांनी सेवेत दाखल व्हावे अस आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.