नाशिक: नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Central Jail) मोक्काअन्वये शिक्षा भोगत असलेल्या बंदीविरोधात खोटे आरोप करून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.सन २०१६ मध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी बंदीवानाच्या पत्नीने न्यायालयाकडे दाद मागितली होती. जिनल विन्सिल मिरांडा (रा. साईबाबा कॉम्प्लेक्स, कासारवड वली, ठाणे पश्चिम) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित तुरुंगाधिकारी खारतोडे, आहिरे, मयेकर, बाबर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी फड, तुरुंगाधिकारी खैरगे, सहायक उपनिरीक्षक सुपारे, शिपाई दातीर या तत्कालिन तुरुंगाधिकाऱ्यां वर गुन्हे (Fir against six prison officials ) दाखलआहेत.
जिनल मिरांडा यांचे पती विन्सिल रॉय मिरांडा हे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात मोक्काअन्वये व प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होते. २४ डिसेंबर २०१६ रोजी विन्सिल हे यार्ड क्रं.१ मधील सेल नं. ७२ मध्ये आराम करीत होता. त्यावेळी संशयित तुरुंगाधिकारी खारतोडे याने मिरांडा यास सॅमसंगचा मोबाईल दिला व तुला जेलमधून लवकर सुटकेसाठी चांगला रिपोर्ट देतो असे आमिष दाखविले व मोबाईल विकून टाक असे सांगितले. बंदी मिरांडा याने नकार दिला.
संशयित खारतोडे याने खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या उद्देशाने, हा मोबाईल फोडून त्यातील बॅटरी विन्सिल याने स्वत:जवळ ठेवत सेलच्या शौचालयात टाकल्याचे वॉकीटॉकीवरून वरील सर्व संशयित तुरुंगाधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर वरील तुरुंगाधिकाऱ्यांनी विन्सिल यांना कारागृहाच्या टॉवर नेत लाकडी व प्लॅस्टिक काठीने बेदम मारहाण केली. तसेच, संशयितांनी मारून टाकण्याची धमकी देत जबर जखमी केले. तसेच, यानंतर या तुरुंगाधिकाऱ्यांनी विन्सिल याला इतर कैदी मारहाण करतील, या उद्देशाने जनरल वाॅर्डमध्ये शिफ्ट केले. तुरुंगाधिकारी खारतोडे याने खोटा गुन्हा दाखल करीत, जातीवाचक शिवीगाळ केली.
कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचाराच्या कागदपत्रांवर मारहाणीच्या खुनांच्या तपशीलाची नोंद केला नाही. याबाबत जिनल मिरांडा यांनी २०१७ मध्ये नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज करुन दाद मागितली. त्यानुसार, न्यायालयाने ५ मे २०१७ रोजी नाशिकरोड पोलिसांना संशयितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, त्यानुसार सहा वर्षांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, हा गुन्हा दाखल करण्याबाबत संशयित हे सरकारी नाेकर असल्याने यासंदर्भात पोलीस आयुक्त, सहायक सरकारी अभियोक्त्यांकडे अभिप्रायासाठी कागदपत्रे पाठविली होती. या अभिप्रायानंतर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक पाचाेरकर व आर. एस. मुनतोडे हे करत आहेत.