नाशिक - आडगाव पोलीस वसाहतीमधील स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. पोलीस वसाहतीमध्येच हा प्रकार घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दुसरीकडे एटीएमबाहेर सुरक्षा रक्षक नसल्याने बँकेचा ढिसाळ कारभार समोर आला आहे.
आडगाव येथील पोलीस मुख्यालयातील स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत चोरट्यांनी पोलीस प्रशासनालाच आव्हान दिल्याचे उघड झाले आहे. याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जत्रा चौक शाखेचे सर्व्हिस मॅनेजर मुकुंद नंदवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आडगाव येथे ग्रामीण पोलीस दलाचे मुख्यालय आणि पोलीस वसाहत आहे. याठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एटीएम मशीन बसवण्यात आले आहे. गुरुवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांना कोडनंबर न उघडताना आल्याने एटीएममध्ये पैसे सुरक्षित राहिले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून मशीनवर असलेले स्क्रिन बॉक्स आणि कव्हर काढताना त्याची तोडफोड केल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, त्यांना तिजोरी फोडता आली नाही. या ठिकाणी असलेला सीसीटीव्हीसुद्धा चोरट्यांने फोडून टाकले आहेत. हा सर्व प्रकार डिव्हीआरमध्ये रेकॉर्ड झाला आहे. त्यामध्ये एक चोरटा तोंडाला रुमाल बांधून एटीएम मशीन फोडताना दिसत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी सांगितले.
स्टेट बँकेकडून एटीएमजवळ सुरक्षेच्या दृष्टीनेही एकाही सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली नाही. पोलीस प्रशासनाकडून आणि बँक मॅनेजर यांच्या बैठका घेऊन त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षक नेमण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, बँकेच्या ढिसाळ नियोजनामुळे चोरटे अशाप्रकारे एटीएमला आपले लक्ष्य बनत असल्याचे समोर येत आहे.