नाशिक - सुरगाणा तालुक्यात गस्त घालणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर दारू माफिया आणि अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या माफियांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे यावेळी अधिकाऱ्यांनी उपस्थित पोलिसांवर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर दारू माफियांकडून प्राणघातक हल्ला पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय दिंडोरी येथील भरारी पथक क्रमांक तीन यांना अवैध दारू वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळली होती. त्यानुसार भरारी पथकातील जवान महेश खामकर, विजय पाटील, विष्णु सानप, सोमनाथ भांगरे हे खाजगी वाहनाने सुरगाणाच्या दिशेने रवाना झाले. त्यांना उंबराळे मार्गावर एक पिकअप वाहन संशयास्पद पद्धतीने जात असल्याचे दिसले. त्यांनी गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवली. या गाडीत दारू असल्याचे आढळल्याने पथकाने या वाहनावर करवाई केली.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड
पथकाने केलेल्या कारवाईचा राग आल्याने दुसऱ्या गाडीत असलेल्या दारू मफियांनी राज्य उत्पादन विभागाच्या गाडीचा पाठलाग करत चार किलोमीटरवर असलेल्या उंबरठाण चौफुलीवर भरारी पथकाची गाडी अडवली. ह्या ठिकाणी आधीच काही संशयित तयारीत होते. पथकाची गाडी थांबताच सर्वांनी लाठ्या, काठ्या आणि लोखंडी रॅडने पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे हा प्रकार सुरू होता. त्या ठिकाणी पोलीस व्हॅनमध्ये पोलीस उपस्थित असूनसुद्धा त्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे. या घटनेत पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हाताला, पाठीला, डोळ्याला गंभीर झाल्या आहेत. दरम्यान, सुरगाणा पोलीस ठाण्यात 8 ते 10 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.