नाशिक- दिंडोरी तालुक्यातील वणी येथील के आर टी हायस्कूलच्या क्रीडा शिक्षकावर हल्ला करून लाकडी दांडक्याने डोक्याला दुखापत केल्याप्रकरणी तक्रार देण्यात आली आहे. शांताराम धोंडीराम शार्दुल (रा. तलाठी कॉलनी, टेकाडी) हे गेल्या दोन वर्षांपासून कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
शांताराम शार्दुल हे नेहमीप्रमाणे सोमवारी (दि. 30 डिसें.) साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ते विद्यालयात गेले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शाळेच्या मैदानावर गेले. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना व्हॉलीबालच्या खेळासाठी प्रशिक्षण देत होते. त्या दरम्यान, हर्ष अशोक पेंढारी हा त्याच्या मित्रासमवेत मैदानाच्या मागील बाजूने आला याचा जाब विचारत शार्दूल यांनी या ठिकाणाहून निघूण जाण्यास सांगितले. मात्र, या मुद्द्यावरून आम्हाला येथे का बसू देत नाही, अशी विचारणा करून हर्ष शिवीगाळ करू लागला. ही माहिती देण्यासाठी शार्दुल यांनी सहकारी शिक्षकांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. दरम्यान, हर्ष पेंढारी याने लाकडी दांडक्याचा प्रहार शार्दुल यांच्या डोक्यात मागून केला. अनपेक्षीत हल्ला झाल्याने शार्दुल यांनी मदतीसाठी आरडा-ओरडा केला. शिक्षक व मुख्याध्यापक यांनी घटनास्थळी धाव घेतली.