नाशिक- ऑक्टोबरमध्ये राज्यातील विधानसभा निवडणुका होतील, असे संकेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. तर, सप्टेंबरमध्ये निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागण्याची शक्यताही त्यांनी सांगितली आहे. शहरात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महाजन बोलत होते.
नाशिकमध्ये झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांनी हे वक्तव्य केले आहे. यात ऑक्टोबरच्या १० किंवा १३ तारखेला विधानसभा निवडणुका होतील. तसेच सप्टेंबरच्या १० ते १५ तारखेला आचारसंहिता लागू शकते, असेही ते म्हणाले.
ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याचेही दिले संकेत गेल्या निवडणूक कार्यक्रमा वरून गिरीश महाजन म्हणाले की, 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तारखेनुसार मी यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखेचा अंदाज व्यक्त केला आहे. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना महाजन यांनी आघाडीतील नेत्यांच्या भाजपप्रवेशाबाबत भाष्य केले. महाजन म्हणाले की, लोकसभा निवडणुकीवेळी विरोधी पक्षनेत्यांपासून अनेक बडे नेते भाजपमध्ये आले. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पुढच्या बाकावरचे नेते सोडले तर त्यांच्या मागे उभे राहायला कोणीही तयार नाही.
विरोधी पक्षाच्या पहिल्या फळीतील अनेक नेते आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत. आषाढी एकादशीला जसे वारकऱ्यांचे डोळे विठुरायाकडे लागतात तसे आता सगळ्यांचे (काँग्रेस राष्ट्रवादीतील सर्व नेत्यांचे) भाजपकडे लक्ष आहे, कारण भारतीय जनता पक्षाशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही. थोरातांच्या निवडीवर शुभेच्छा देत महाजन म्हणाले की यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने 50 आमदारांचा आकडा पार करून दाखवावा, असे अव्हानही दिले आहे.
काय होती गेल्या वेळची परिस्थिती -
राज्यात 15 ऑक्टोबर 2014 ला एकाच टप्प्यात 288 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुका झाल्या होत्या. तर, 19 ऑक्टोबरला या निकाल जाहीर करण्यात आला होता. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक म्हणजेच 122 जागा मिळाल्या होत्या तर, शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 42 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या.
लोकसभा 2019 साठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र निवडणुका लढवल्या पण निवडणुकीनंतर त्यांनी एकत्रपणे सरकार स्थापन केले.