नाशिक -विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबाबत चर्चा करणार आहोत. माणिकराव ठाकरे यांच्यावर या चर्चेची जबाबदारी दिली आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी रविवारी दिली.
विधानसभेसाठी वंचित बरोबर चर्चा करणार - अशोक चव्हाण - vbi
विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबाबत चर्चा करणार, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.
मनसेला सोबत घेण्यासंदर्भात प्रस्ताव येत आहेत. मात्र, अजून काही निर्णय घेण्यात आला नाही. मनसेला घेण्याबाबत काही मतभेद आहेत, असे चव्हाण म्हणाले. आगामी निवडणुकीसाठी समविचारी पक्षांशी आघाडी करण्याआधी जिल्हाध्यक्षांना विश्वासात घेऊन त्यांचे म्हणणे ऐकण्यात आले आहे. यावेळी नवीन चेहऱ्यांना, तरुण तसेच महिलांना संधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ७ जुलैपर्यंत राज्यभरातून इच्छुकांचे अर्ज मागवले जाणार आहेत. राष्ट्रवादी बरोबर आघाडी करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला आहे. ८ दिवसात जागा निश्चित होतील, असे ते म्हणाले.
हवा येते तशी जाते, ही निवडणूक झाल्यानंतर कळेल कोणाची हवा आहे. गिरीश महाजनांनी ५० पेक्षा जास्त विरोधकांचे उमेदवार निवडून येणार नाहीत, असे सांगितले. मात्र, असे सांगणे म्हणजे सर्व काही फिक्स आहे, असे म्हणत चव्हाण यांनी भाजपवर टीका केली. महाजनांनी मतपत्रिकेचा वापर करणार, की नाही याबाबत बोलावे. भाजपकडून साम-दाम-दंड-भेद याचा वापर केला जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.