नाशिक Kalaram Temple : 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. यासाठी नाशिकमधील 27 पिढ्यांपासून जतन केलेल्या काळाराम मंदिराचे पूजाविधी अयोध्येतील श्रीराम मंदिर न्यासाला उपलब्ध करून देण्यात आले आहे. काळाराम मंदिरातील 50 ते 60 टक्के पूजेचा अयोध्येतील राम मंदिरातील पूजेत समावेश केला जाणार आहे, असं महंत सुधीरदास पुजारी यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितलंय.
काळाराम मंदिरातील पूजाविधी समाविष्ट : अयोध्येतील राम मंदिराच्या भव्यतेसोबतच पूजा देखील भव्य असणार आहे. त्यामुळं पूजेच्या सर्व संकेतांचं काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. यासाठी संहिता तयार करण्याचं काम वर्षभरापासून सुरू आहे. त्यानुसारच राम मंदिरात पूजा होणार आहे. यासाठी नाशिकच्या काळाराम मंदिरातील सुमारे 60 टक्के पूजाविधी नवीन पूजाविधीमध्ये स्वीकारण्यात आलाय, असं मंहत सुधीरदास पुजारी यांनी म्हटलंय.
नाशिकच्या धार्मिक परंपरेला महत्त्व : दिवंगत भैय्या शास्त्री पुजारी यांनी या पूजेची पोथी जतन केल्याचं महंत सुधीरदास महाराज यांनी सांगितलं. राम मंदिरातील पुजारी परंपरेचा उल्लेख महानुभाव पंथाच्या पूज्य चक्रधर स्वामी यांच्या लीळाचरित्रात आहे. समर्थ रामदास स्वामींनी या मंदिराला वारंवार भेट दिल्याचे ऐतिहासिक उल्लेख सापडतात. नाशिक हे यजुर्वेद, संस्कृत अध्ययनाचं देश स्तरावरील त्या वेळेचं महत्त्वाचं केंद्र होतं. देशभरात आजही नाशिकच्या धार्मिक परंपरेला महत्त्व दिलं जातं. अयोध्येतील राम जन्मभूमी गर्भगृहात 22 जानेवारी रोजी होणाऱ्य सोहळ्यासाठी महंत सुधीरदास यांना निमंत्रित करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय.