नांदेड : निर्मल-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील अपघात ताजा असताना नांदेड-किनवट राष्ट्रीय महामार्गावर अशाच अपघाताची पुनरावृत्ती झाली आहे. सिमेंट वाहून नेणारा ट्रक अर्धवट काम झालेल्या पुलावरून खाली कोसळला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
तिघे गंभीर जखमी..
या भीषण अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. विकास नरवाडे हा चंद्रापूर येथिल तर पल्ली कोंडावार हे यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना प्रथमोपचारासाठी हिमायतनगर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
नांदेडमध्ये अपघाताची पुनरावृत्ती; राष्ट्रीय महामार्ग प्रशासन झोपेतच सिमेंट वाहतूक करणारा ट्रक उलटला..
सिमेंट वाहतूक करणारा ट्रक प्रगतीपथावर असलेल्या पुलावरून खाली कोसळला. याठिकाणी कसल्याही प्रकारचे दिशा दर्शक लावण्यात आले नाहीयेत. यामुळे हा अपघात घडल्याची माहिती आहे. रविवारी सकाळच्या सुमारास किनवट नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील पांगरी फाट्याजवळील ब्रीजवर हा अपघात घडला.
अपघाताची पुनरावृत्ती..
नांदेड-निर्मल राष्ट्रीय महामार्गावरील अपघात ताजा असताना प्रशासनाला जाग आली नाहीये. शनिवारी या मार्गावर दुचाकीवरन जाणाऱ्या किरण राठोड या तरुणाचा पुलासाठी खोदण्यात आलेल्या खड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अपघातातून प्रशासनाला मात्र जाग आली नाहीये. रविवारी पुन्हा असाच अपघात किनवट-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर घडला आहे. सिमेंट घेवून जाणारा ट्रक पुलावरून सरळ खड्यात आदळला. या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
प्रशासनाचा निष्काळजीपणा..
मागील दोन ते तीन वर्षापासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहेत. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही कामं अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. अनेक ठिकाणी दिशादर्शक लावण्यात आले नाहीत तसेच धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आलेली नाहीयेत. यामुळं या मार्गांवर अपघाताचे प्रमाण वाढलं आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.