एल्गार संघटना पदाधिकाऱयाचा शासनाला इशारा नाशिक : मिळालेल्या माहितीनुसार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथे आदिवासी विकास भवनाची शासकीय आश्रम शाळा आहे. याठिकाणी पहिली ते बारावीपर्यंत मुलींना शिक्षण दिले जाते. या शाळेला वैतरणा धरणातून स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना करण्यात आली आहे. धरणातून येणारे पाणी एका विहिरीत टाकले जाते आणि तेथून ते शाळेतील विद्यार्थिनींना पिण्यासाठी दिले जाते; मात्र वैतरणा धरणाचा पाणीसाठा कमी झाल्याने धरणातून विहिरीत पाणी येत नाही.
एल्गार कष्टकरी संघटनेचा आरोप:मुलींना पाणी पुरणार नाही म्हणून पहिली ते नववी वर्गांना सुट्टी दिली आहे. तर फक्त इयत्ता दहावी बारावीचे वर्ग सुरू आहेत. एकीकडे मुंबईला वैतरणा धरणातून पाणी दिले जाते; पण ज्या ठिकाणी आदिवासी मुली शिक्षण घेतात त्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी नाही म्हणून शाळाच बंद केली गेली. या सर्व मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचे एल्गार कष्टकरी संघटनेने आदिवासी अप्पर आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
लवकरात लवकर वर्ग सुरू करावे:देवगाव तेथील मुलींच्या शासकीय आश्रम शाळेत पाणी नसल्याने गेल्या दहा दिवसांपासून पहिली ते नववी चे वर्ग बंद ठेवण्यात आले. यामुळे मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येत आहे. ही घटना अतिशय निंदनीय असून शाळेत पाण्याची व्यवस्था करण्याऐवजी मुलींना घरी पाठवणे गंभीर बाब आहे. शासनाचे कुठलेही पत्रक नसताना वर्ग कोणी बंद ठेवले, याबाबत चौकशी झाली पाहिजे. याबाबत आम्ही एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने अप्पर आयुक्तांना निवेदन दिले आहे. उद्यापासून हे वर्ग सुरू झाले पाहिजे अशी मागणी आम्ही केली आहे, असे एल्गार संघटना पदाधिकारी भगवान मधे यांनी सांगितले. यामुळे विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये असंतोष वाढत आहे. शाळा सुरू न केल्या गेल्यास पालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शासनाचा कानाडोळा:शासकीय आश्रमशाळेतील समस्या सोडविण्याकडे प्रशासनही दुर्लक्ष करत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. शाळा बंद ठेवल्याने आश्रमशाळा चालकांचे आणि इतर कर्मचाऱ्यांचे फावत असले तरी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असते. राज्यात अनेकदा अशा घटना उघडकीस आल्या. मात्र, शासनाने त्याकडे कानाडोळाच केला.