नाशिक- येथून शिर्डी-येवला मार्गे मनमाडकडे राज्यमार्ग जातो. या मार्गावर येवला आणि मनमाडच्या दरम्यान अंकाई-टंकाईचे जोडकिल्ले आहेत. सध्या हे किल्ले पर्यटनासाठी लोकप्रिय ठरत आहेत. रविवारी व सुट्टीच्या दिवशी तर काहीजण या ठिकाणी मित्र परिवार आणि परिवारासह ट्रेकिंगला येत आहेत.
प्रतिक्रिया देताना पर्यटक
किल्यावर कसे जाता येईल-
अहमदनगर मनमाड या रेल्वे मार्गावर अंकाई हे लहानसे रेल्वे स्टेशनही आहे. या रेल्वे स्टेशनपासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर अंकाई गाव आहे. एस.टी.बस रेल्वे तसेच खासगी वाहनानेही इथपर्यंत पोहोचता येते. रेल्वे स्थानकापासून गावापर्यंत जाण्यासाठी भाड्याची वाहनेही उपलब्ध होतात. अंकाई गावातून हे जोडकिल्ले एकदम दृष्टीस पडतात. या किल्ल्यामध्ये एक खिंड आहे. दोन्ही किल्ल्यांना जोडणारी ही खिंड दोन्हीकडून भक्कम तटबंदी घालून बंदिस्त करण्यात आली आहे. किल्ल्यांमधील खिंड बंदिस्त करुन गडाचा मार्ग दुर्गम आणि संरक्षित केलेला आहे. अशा प्रकारचे बांधकाम महाराष्ट्रामध्ये इतरत्र आढळत नाही. असे हे एकमेव बांधकाम आहे.
टंकाईच्या किल्ल्याला एक लेणी आहे. ती गावातून दिसते. या जोड किल्ल्यांमधील डावीकडील अंकाई तर उजवीकडील टंकाईचा किल्ला आहे. लेणीकडे जाणार्या पायवाटेवर पायर्याही केलेल्या आहेत. टंकाईच्या डोंगराला ही लेणी आहे. लेणी प्रथम पाहून नंतर किल्ल्यावर चढाई करणे सोयीचे आहे. लेणी ही जैन धर्मियांची आहे. या लेणीमधे इंद्रदेव, शांतीनाथ, पार्श्वनाथ अशा काही देखण्या मूर्ती असून कोरीव स्तंभही पाहायला मिळतात. या लेणीमधे गणेशाचीही मूर्ती पाहायला मिळते. लेणी पाहून किल्ल्याच्या वाटेवर निघावे. साधारण २० मिनिटांमधे आपण अंकाई-टंकाईच्या खिंडीजवळ पोहोचतो. खिंडीतील मार्ग तटबंदीने बंदिस्त केलेला आहे. त्या तटबंदीमधे देखण्या बांधणीचा भक्कम दरवाजा आहे. या दरवाजातून आत आल्यावर आपण तटबंदीने बंदिस्त केलेल्या मोकळ्या जागेत येतो.
अंकाई-टंकाई जोडदुर्ग-
अंकाई-टंकाई या जोडदुर्गामधील अंकाईचा दुर्ग महत्त्वाचा आहे. तसेच टंकाई हा दुय्यम दुर्ग आहे. या जोडदुर्गांना जोडणार्या खिंडीलाच बंदिस्त केल्यामुळे टंकाईचा प्रवेशमार्ग अंकाईच्या कह्यात आलेला आहे. अंकाईच्या माथ्यावरून खिंडीपर्यंत येणार्या धारेवरच अंकाईचा चढाईचा मार्ग आहे. या मार्गावर एका पाठोपाठ एक, असे पाच दरवाजे बांधलेले आहेत. या दरवाजांमुळे गडावर जाणारा मार्ग सुरक्षित करण्यात आलेला असून शत्रुसाठी मात्र दुर्धर झालेला आहे. या मार्गाच्या बाजुला डोंगरांमधे काही लेण्या कोरलेल्या आहेत. पाण्याची टाकीही कोरलेली आहे. या लेण्या अर्धवट कोरलेल्या दिसतात. तर काहींची तोडफोडही झालेली दिसते. अंकाई माथ्यावर एक टेकडी असून यातून एक गुहा जाते. या गुहेला स्थानिक लोक सीतागुंफा म्हणतात. यातील एका गुहेत अगस्ति ऋषींचे मंदिर असून बाजुची गुहा मुक्कामासाठी चांगली आहे. या परिसरात भाविकांचा ओघही खूप असतो.
पुन्हा पायर्याउतरुन आपण खिंडीत येतो. येथून टंकाईवर चढाई करुन आपण दरवाजातून माथ्यावर पोहोचतो. येथून अंकाईचे आणि खिंडीतून बांधलेल्या तटबंदी दरवाजाचे होणारे दर्शन आपल्याला खिळवून ठेवते. टंकाईच्या विस्तृत पठारावर पाण्याचे टाके शिवलिंग, नंदी, पाण्याचा तलाव असे तुरळक अवशेष पहायला मिळतात. गडफेरी करून आपण पुन्हा खिंडीतून परतीच्या मार्गाला लागतो.
अशा या अंकाई-टंकाई किल्ल्यावर दर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी मनमाड, नांदगाव, येवला, कोपरगाव या तालुक्यांतील नागरिकांसह संपूर्ण महाराष्ट्रातून गड किल्ले भ्रमंती करणारे तसेच गड किल्ल्यांचे प्रेमी येतात. तसेच शालेय सहलीदेखील येतात. ऑगस्ट महिन्यात या ठिकाणी श्रावण महिन्यात मोठी यात्रा भरते. मनमाड शहराला जरी लागून असले तरी ते येवला तालुक्यात येत असल्याने येथील आमदार विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांनी या किल्ल्याचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करावा, अशी मागणी निसर्गप्रेमी आणि गड किल्ले प्रेमी करत आहेत.