नाशिक - निवडणुकीच्या आखाड्यात कोणताही पैलवान उरला नसल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यानंतर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर देताना फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. 'हा' गडी कोणत्याही बाजूने पैलवान वाटत नसल्याचा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. तसेच आखाड्यात कोणीही नाही, असे फडणवीस म्हणत असल्यास पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या राज्यभरात जवळपास 30 सभा घेण्यामागचे कारण काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नांदगाव मतदारसंघात पंकज भुजबळ यांच्या प्राचारार्थ आयोजित प्रचारसभे दरम्यान खासदार कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
शिवसेनेबद्दल बोलताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची एकही विट न रचता घोटाळा करणाऱ्यांना आणि महाराजांचे गड-किल्ले हेरिटेज हॉटेलसाठी भाड्याने देणाऱ्यांना जनता धडा शिकवणार असल्याचे कोल्हे म्हणाले. तसेच शिवसेनेच्या वाघाची केव्हाच शेळी झाल्याची टीका त्यांनी केली आहे.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही जोरदार फटकेबाजी करून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर टीकास्त्र सोडले. 'आपल्या सुरक्षेसाठी राफेल आणि राफेलच्या सुरक्षेसाठी लिंबू' असे गणित असेल, तर ही पॉवरफुल लिंबू सर्वत्रच लावा, असा टोली भुजबळ यांनी लगावला.
आमदार पंकज भुजबळ व जिल्ह्यातील सर्व जागांवर उभ्या असलेल्या आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन खासदार कोल्हे व छगन भुजबळ भाषणात यांनी केले.