अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया नाशिक :सिन्नरटोल नाक्यावर तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. कार्यकर्त्यांना जामीन मिळाल्यानंतर अमित ठाकरे यांनी स्वतः कार्यकर्त्यांची आज नाशिकमध्ये भेट घेतली. तसेच केक कापून मनसैनिकांचे कौतुक केले. त्यांनतर अमित ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला. मी फक्त या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आलो आहे, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली आहे.
म्हणून केले अभिनंदन :ही सर्व घटना नियोजनबद्ध नसून अनावधानाने घडली, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली आहे. टोल बुथवरून हॉटेलमध्ये आल्यावर मनसे सैनिकांनी टोल फोडल्याचे मला कळले. माझ्या प्रेमापोटी त्यांनी हे केले. स्वत:वर केसेस घेणे ही सोपी गोष्ट नाही. आज त्यांना जामीन मिळाला आहे. त्यामुळेच मी त्यांना मुंबईहून नाशिकला भेटण्यासाठी आलो आहे. मी टोलनाके तोडण्याचे समर्थन करत नाही. मात्र, आज पैसे वसूल करण्यासाठी टोलनाक्यांवर बाऊन्सर ठेवले जातात. सर्वसामान्यांच्या विरोधात बाऊन्सर हात उचलतात. नागरिकांना उद्धटपणे बोलतात. त्यामुळे बाऊन्सरची गुंडगिरी कुठेतरी थांबली पाहिजे, असे मत अमित ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
सात मनसैनिकांवर गुन्हा :अमित ठाकरे शनिवारी (२३ जुलै) उत्तर महाराष्ट्र दौरा आटोपून मुंबईत परतत होते. त्यावेळी नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील टोल नाक्यावर अमित ठाकरे यांची गाडी थांबली होती. तेथे मनसेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी टोल कर्मचाऱ्यांचा अमित ठाकरे यांच्याशी वाद झाल्याचे सांगत टोलची तोडफोड केली होती. त्यानंतर टोलची तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मनसेचे पदाधिकारी बाजीराव मते, शशी चौधरी, ललित वाघ, स्वप्निल पाटोळे, शुभम थोरात, प्रतीक राजगुरू, शैलेश शेलार यांना अटक केली होती. या सर्वांना सिन्नर कोर्टामध्ये हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. आज पुन्हा दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या सर्वांना जामीन मंजूर केला. यावेळी नाशिक मनसे विधी विभाग तर्फे ॲड. नितीन पंडित, ॲड. राहुल तिडके, ॲड. महेंद्र डहाळे, ॲड. भाग्यश्री ओझा यांनी काम पाहिले.
हेही वाचा -MNS Workers Vandalize Toll Plaza: अनधिकृत टोलनाक्याविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसेकडून पुन्हा राडा, अमित ठाकरेंच्या दौऱ्यात काय घडले?