महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक : कोरोना महामारीत रुग्णवाहिका ठरल्या रुग्णांसाठी देवदूत, अनेकांचे वाचले प्राण

नाशिक जिल्ह्यात कोरोना काळात सरकारी तसेच खासगी रुग्णवाहिकांनी महत्वाची भूमिका बजावली. रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना हॉस्पिटलमध्ये वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचण्यास मदत झाली.

ambulances-became-angels-for-patients-
ambulances-became-angels-for-patients-

By

Published : Jun 16, 2021, 5:48 PM IST

नाशिक -जिल्ह्यात कोरोना काळात सरकारी तसेच खासगी रुग्णवाहिकांनी महत्वाची भूमिका बजावली. रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना हॉस्पिटलमध्ये वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचण्यास मदत झाली.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अधिक होता. एकट्या नाशिक जिल्ह्यात मार्च, एप्रिल या दोन महिन्यात दीड लाखाहून अधिक जण कोरोनाबाधित झाले. यातील अनेक घरीच उपचार घेऊन बरे झाले. मात्र बहुतांश रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. या काळात मात्र रुग्णवाहिकांची मोठी जबाबदारी राहिली. प्रत्येक रुग्णवाहिका चालकाने आपल्या जीवाची परवा न करता माणूसकी धर्म जपला. त्यामुळे हजारो रुग्णांना वेळेवर हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले. नाशिक जिल्ह्यात एकूण 547 रुग्णवाहिका आहेत. यात नाशिक महानगरपालिकेच्या 20 रुग्णवाहिका असून कोविड काळात 15 खासगी रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. तर जिल्हा आरोग्य विभागाकडे 20 रुग्णवाहिका असून कोविडसाठी 108 च्या 15 रुग्णवाहिका कार्यरत आहेत.

कोरोना महामारीत रुग्णवाहिका ठरल्या रुग्णांसाठी देवदूत
म्हणून आम्ही केली मदत -

कोरोना काळात मोठा अनुभव राहिला. या काळात रुग्णसेवा करण्याची संधी मला मिळाली. माझी स्वतःची रुग्णवाहिका असून मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात नाशिकमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्याकाळात मी काम केले. जिथे कोरोनाबाधित रुग्णाला नातेवाईक देखील मदत करत नव्हते, तेव्हा मी अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आज या गोष्टीचे समाधान वाटत असल्याचे रुग्णवाहिका चालक सचिन पाटील यांनी सांगितले.

ऑक्सिजन रुग्णवाहिकांमूळे वाचले प्राण -

नाशिक जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाची बिकट परिस्थिती होती. या काळात रुग्णसंख्या मोठया प्रमाणात वाढल्याने शहरातील सर्वच सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमधील बेड फुल्ल झाले होते. आम्ही आमच्या रुग्णांना बेड मिळण्यासाठी पाच ते सहा तास रुग्णवाहिकेत घेऊन फिरलो. सहा तासानंतर आम्हाला बेड मिळाला मात्र रुग्णवाहिका मध्ये ऑक्सिजनची सोय असल्याने आमच्या पेंशट प्राण वाचले,तेव्हा रुग्णवाहिका आमच्या साठी देवदूत ठरली अशी प्रतिक्रिया एका रुग्णाच्या नातेवाइकांनी दिली..

रुग्णवाहिका मुबलक प्रमाणत -

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून अ‌ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 45 हजाराहून आता 3 हजार 778 वर आली असून नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत देखील घट झाली आहे. तसेच सर्वच हॉस्पिटलमध्ये बेडची उपलब्धता असून रुग्णवाहिका देखील सहज उपलब्ध होत आहे.

रुग्णवाहिकेतून ऑक्सिजनची वाहतूक -

कोरोनाची रुग्णसंख्या अचानक वाढल्याने नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता, अशा वेळी अनेक खासगी हॉस्पिटलने रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी ऑक्सिजन प्लांटमधून तात्काळ ऑक्सिजन सिलेंडरची वाहतूक करण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर केला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णवाहिकांनी महत्वाची भूमिका बजावली.

काहींनी हात धुवून घेतले -

कोरोना काळात जिथे काही खासगी हॉस्पिटलने रुग्णांची आर्थिक लूट केली, ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने त्यासाठी जादा पैसे मोजावे लागले. रेमडेसिवीरचा काळा बाजार करण्यात आला. याच परिस्थितीत काही रुग्णवाहिका चालकांनी देखील आपले हात धुऊन घेतले. जिथे 500 रुपये रुग्णवाहिकेचे भाडे होते तिथे 1500 रुपये आकारण्यात आले. नागरिकांनी देखील रुग्णांचे प्राण वाचावे म्हणून चालक म्हणेल ती रक्कम देऊ केली. अशात परिवहन विभागाकडून रुग्णवाहिकांसाठी दर ठरवून दिले. असताना सुद्धा खासगी रुग्णवाहिकेकडून जादा दर आकारण्यात आले होते.

रुग्णवाहिकेसाठी आरटीओने ठरवून दिलेले दर..

रुग्ण वाहिका 25 किलोमीटर किंवा 2 तासासाठी प्रति किलोमीटर
मारुती व्हॅन/मारुती इको 500 रुपये रु 11/-
टाटा सुमो, जीप 600 रुपये रु 12/-
टाटा 407/ स्वराज माझदा 800 रुपये रु 13/-
आयसीयू 1000/- रु 20/-

ABOUT THE AUTHOR

...view details