नाशिक - केंद्र सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. मात्र, हळूहळू अर्थचक्राला चालना देण्यासाठी उद्योग-धंदे सुरू करण्याला परवानगी दिली आहे. त्यानुसार शहरासह जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रे वगळून सर्व दैनंदिन व्यवहाराचे दुकाने, आस्थापना सुरू करता येतील, असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले. त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.
नाशिक जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरातील सर्व दुकाने उघडणार - जिल्हाधिकारी - नाशिक जिल्हाधिकारी सुरज मांढरे
लॉकडाऊनच्या काळात व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच सर्वच क्षेत्रातील अर्थचक्र थांबले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. मात्र, हळूहळू अर्थचक्राला चालना देण्यासाठी उद्योग-धंदे सुरू करण्याला परवानगी दिली आहे.
दरम्यान, हे सगळे सुरू झाल्यानंतर प्रत्येक दुकानदाराने सोशल डिस्टन्सिंगच्या आदेशाचे पालन करून ग्राहकांना ठराविक अंतरावर उभे राहून माल खरेदी करता येईल, अशा दृष्टीकोनातून वस्तू मांडाव्यात. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास पुन्हा पूर्वीप्रमाणे निर्बंध लागू करण्यात येतील, अशीही तंबी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यात मालेगाव वगळून इतर प्रतिबंधित क्षेत्रात केवळ सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू असतील. दुसरीकडे ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये सर्व प्रकारच्या दुकानांना उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली असून सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत ही दुकाने सुरू असतील. दुकानदारांनी सकाळी सातलाही दुकान उघडले चालेल. मात्र, सायंकाळी सातनंतर कुठल्याही दुकानदाराला दुकान सुरू ठेवता येणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.