महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉक डाऊनमध्येही सुरू राहणार कृषी विषयक सेवा; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती - लॉकडाऊन

लॉक डाऊनमध्येही कृषी विषयक सर्व सेवा सुरळीतपणे सुरू राहतील. सर्व शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

Dadaji Bhuse
कृषी मंत्री दादाजी भुसे

By

Published : Mar 26, 2020, 8:39 PM IST

नाशिक - कृषी बियाणे, खते, पिकांची कापणी आणि वाहतुकीसंदर्भात कुठल्याही प्रकारची बंदी नाही. लॉकडाऊनमध्येही या सर्व सेवा सुरळीतपणे सुरू राहतील. सर्व शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

लॉकडाऊनमध्येही सुरू राहणार कृषी विषयक सेवा

कृषी मंत्री भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आणि शेतीपुरक उद्योगांना लॉकडाऊनमध्ये येणाऱ्या अडचणी संदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा -कोरोनाविरोधात तीन वर्षाच्या चिमुकलीचा लढा यशस्वी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊननंतर जनतेला योग्य मार्गदर्शन केले आहे. त्याप्रमाणे प्रत्येकाने स्वत: ची आणि देशाची काळजी घेतली पाहिजे. सद्य: स्थितीत घाबरुन जाण्यासारखी कुठलीही परिस्थिती नसून नागरिकांनी शासन आणि प्रशासनाला सहकार्य केल्यास या कोरोनाच्या संकटाचा आपण सक्षमपणे मुकाबला करू शकतो, असे भुसे म्हणाले.

नाशिक जिल्ह्यात 144 कलम लावल्यानंतर शेती संबधित बियाणे, खते, व्यवसाय, शेतीपुरक व्यवसायांच्या वाहतुकीला अडथळे निर्माण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. शेतीविषयक कुठल्याही वाहतुकीला अडथळा येणार नाही, या संदर्भात प्रत्येक विभागातील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना (आरटीओ) सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार आरटीओने जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनांना ऑनलाईन परवाने आणि स्टीकर देण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचा लाभ सर्व संबंधितांनी घ्यावा. कृषीमाल वाहतुकीसाठी नाशिक जिल्ह्याला जोडल्या गेलेल्या मुंबई, पुणे या जिल्ह्यांतील सेवाही सुरू राहतील. यासाठी नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कृषीमंत्री भुसे यांनी दिली.

राज्यात अन्न धान्य, भाजीपाला आणि फळे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. आपल्याला घाबरुन जाण्याचे आणि काळजी करण्याचे कारण नाही. त्यामुळे नागरिकांनी साठेबाजी करू नये, असे आवाहन भुसे यांनी केली. यावेळी खासदार डॉ. भारती पवार, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज अहिरे, माजी आमदार अनिल कदम, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details