नाशिक -एखादा धाधांत खोटं बोलत असेल तर त्याच्या बोलण्याला फार महत्व देण्याचे कारण नाही. गत लोकसभेच्या वेळेस राज ठाकरे यांनी आपली सुपारी घेतली होती. आपल्या उमेदवारांच्या सपोर्टमध्ये ते बोलत होते. पण आता तिकडची सुपारी घेतली, अशी जोरदार टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांची नाकाला रुमाल लावण्याची नक्कल केली आणि म्हणाले की जे काही आहे ते एकदाच शिंकरुन घ्या, आणि मग भाषण करा.
सगळ्या सभा संध्याकाळीच घेतात. एखादी सभा दुपारी का घेत नाहीत? - येवल्यातील शिवसृष्टी भुमिपुजनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिकला आले होते. यावेळी ते राष्ट्रवादीच्या मुंबईनाका येथील कार्यालयात बोलत होते. यावेळी अजित पवारांनी मनसेच्या सभेतील आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. पवार जातीयवादी आहे की नाही, हे नाशिककरांना माहित आहे. रामदास आठवले, राजू शेट्टी यांनी देखील सांगितले की पवार जातीयवादी नाही. कालच्या सभेत फक्त शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यावर टीका केली. शरद पवार यांनी कोणाचे नाव घ्यायचे हा त्यांचा प्रश्न आहे. मागील काळात राज ठाकरे यांनी शरद पवार यांचे तोंडभरुन कौतुक केले होते. आम्ही एखाद्याच कौतुक केले आणि नंतर टीका करायचे म्हटले तर जीभ पण वळत नाही, असा जोरदार टोला त्यांनी लगावला. यांना काही घेणे देणे नाही. सगळ्या सभा संध्याकाळीच घेतात. एखादी सभा दुपारी का घेत नाहीत? कधी तरी पंधरा दिवसातून एक सभा तिही संध्याकाळी घ्यायची, अशी खिल्ली त्यांनी राज ठाकरेंची उडवली.