दिंडोरी (नाशिक) -''विकेल ते पिकेल' या संकल्पनेवर आधारित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजना सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतमालास योग्य हमीभाव मिळण्यासाठी शासनस्तरावर विक्री व्यवस्थापनाला बळकटी देणार आहे', असे राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे ग्रामपंचायत सभागृह येथे शुक्रवारी (25 जून) 'विकेल ते पिकेल' अभियान आयोजित करण्यात आले. या अंतर्गत शेतमाल निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन राजस्तरीय कार्यशाळेत दादा भुसे बोलत होते.
महाराष्ट्रव्यापी एकदिवसीय ऑनलाईन शिबीर होणार
'शेतकरी राजा शेतात कुटुंबासह राबत असतो. त्याची प्रगती साधण्याच्या दृष्टीने विकेल ते पिकेल अभियानांतर्गत वाणाच्या बाजारातील मागणीनुसार शेतकऱ्यांनी शेतात पिक घ्यावे. जेणेकरून उत्पन्नास योग्य हमीभाव मिळेल. शेतकरी ते थेट ग्राहक असे विक्री व्यवस्थापन बळकट करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावरून एक धोरण निश्चित केले जाणार आहे. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी बीड मॉडेल सादर करण्यात आले आहे. तसेच द्राक्ष व सिताफळ या पिकांना विमा कवच देण्यात आले आहे. येणाऱ्या काळात शेतकरी, फार्मर प्राड्युसर कंपनी व शेतीमाल प्रक्रिया उद्योजक यांच्या सहभागाने महाराष्ट्रव्यापी एकदिवसीय ऑनलाईन शिबीराचे आयोजन केले जाणार आहे', असे दादा भुसे यांनी म्हटले.