मालेगाव (नाशिक) - राज्यातील कृषी खातं झोपलंय की काय? असा प्रश्न उपस्थित करत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर कृषिमंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू यांना आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. आम्ही त्यांनी दिलेल्या सूचनांचे स्वागत करतो व त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे भुसे यांनी सांगितले.
बच्चू कडूंच्या सूचनांचे स्वागत; चौकशी करून कारवाई करण्याचे कृषिमंत्री दादा भुसेंचे आश्वासन
बच्चू कडूंनी दोन दिवसांपूर्वी राज्याच्या कृषी खात्यावर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडूंना आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे.
राज्याच्या कृषी खात्यावर गंभीर आरोप करत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला होता. यावेळी त्यांनी महाबीजवरदेखील गंभीर आरोप केले. याबाबत कृषिमंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बच्चू कडू यांना आपले मत मांडण्याचा पुर्ण अधिकार असुन त्यांनी दिलेल्या सुचनांचे स्वागत आहे. त्याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. तर महाबीजवरील आरोंपाबाबत सर्व माहिती घेऊन दोषी आढळल्यास योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दादा भुसे यांनी दिले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करायला गेलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्याच सरकारमधील कृषी खात्याला चांगलेच धारेवर धरले. सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. पेरले तेव्हा निघाले नाही आणि हातात येत होते तेव्हा मारून टाकले. राज्यातील कृषी खाते झोपले आहे की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. बियाणे बाजारात विक्रीला येत, तेव्हा प्रामाणिकरण कसे केले जाते. यात काही घोटाळा होत आहे का? हे पाहणे गरजेचे आहे. महाबीजने बाजारातील 2 ते 3 हजार रुपये क्विंटलचे खराब सोयाबीन घेऊन ते पॅकिंग करून शेतकऱ्यांना 8 हजार रुपये क्विंटलने विकले, असा आरोपही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाबीजवर केला होता.