नाशिक : नाशिकमध्ये एक सात महिन्यांची गरोदर माता डॉक्टरांकडे जाण्यासाठी रस्त्यात रिक्षाची वाट बघत होती. यावेळी या गरोदर मातेला अचानक चक्कर आल्याने ती खाली कोसळली. यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्यासोबत पोटात असलेल्या दोन जुळी अर्भकही मृत पावली आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
विक्रीकर भवन परिसरातील गजानन आर्केड या इमारतीत वास्तव्य :मिळालेल्या माहितीनुसार, पूजा देवेंद्र मोराणकर (वय 44 वर्ष, पाथर्डी फाटा) असे मृत्यू झालेल्या मातेचे नाव आहे. नाशिकच्या पाथर्डी भागात विक्रीकर भवन परिसरातील गजानन आर्केड या इमारतीमध्ये मोराणकर गेल्या काही महिन्यांपासून वास्तव्यास आहेत. पूजा गर्भवती असल्याने त्यांची काळजी घेण्यासाठी वडील व त्यांची बहीण पुण्याहून तिच्या सासरीच राहत होते. पूजा मोराणकर या गर्भारपणाच्या काळात घ्यायची सर्व काळजी योग्यप्रकारे घेत होत्या. त्या नियमित स्त्री रोगतज्ज्ञांकडे तपासणीसाठी जायच्या. त्या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या.
गर्भातील जुळ्या अर्भकांचाही दुर्दैवी मृत्यू :पूजा मोरणकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे वडील आणि बहिणीने त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी इमारती खालील रस्ता ओलांडून त्या रिक्षाची वाट बघत असताना, पूजा यांना अचानकपणे चक्कर आली आणि त्या जमिनीवर कोसळल्या. यानंतर पूजाला तातडीने नागरिकांच्या मदतीने पाथर्डी फाटा येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेत गर्भातील जुळ्या अर्भकांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.