नाशिक - राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींच्या 527 जागांसाठी देखील येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी ग्रामस्थ व उमेदवार यांची लगबग सुरू असतानाच दुसरीकडे प्रशासकीय स्तरावर देखील जय्यत तयारी करण्यात आली आहे. तहसील कार्यालयात यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून 59 ग्रामपंचायतसाठी 40 निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार उदय कुलकर्णी यांनी दिली आहे.
प्रशासकीय स्तरावर जय्यत तयारी
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जवळपास तहसील आणि प्रांत कार्यालयांना जत्रेचं स्वरुप आलं आहे. दिवसभरात 95 ते 110 च्या आसपास विविध घोषणापत्र तयार करण्यात येत असून सेतू कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. प्रशासकीय स्तरावर देखील जय्यत तयारी करण्यात आली असून तहसील कार्यालयातील इमारतीच्या वरच्या मजल्यावर यासाठी स्वतंत्र निवडणूक कक्ष तयार करण्यात आला आहे.