नाशिक -शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेत प्रशासनाने कठोर पावले उचलायला सुरूवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून नाशिक शहरात घरातून बाहेर पडताना मास्क न वापरल्यास 200 रुपये दंड करण्याचे आदेश, महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत.
एपीडेमिक अॅक्ट अंतर्गत ही कारवाई केली जाणार आहे. शहरात कोरोनाचे 440 तर जिल्ह्यात तब्बल 2063 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर आहे. यामुळेच महापालिकेने हा निर्णय घेतला. आता कोरोना बरोबर जगायला शिकले पाहिजे. कोरोना आपल्याकडे चालुन येत नाही तर आपण कोरोनाकडे चालून जात आहोत. म्हणून सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणे आणि मास्क वापरणे, या अत्यावश्यक बाबी होऊन बसल्या आहेत. लोकांना सूचना देऊनही ते मास्क वापरत नाहीत. फिजिकल डिस्टन्सिंगचे अंतर ठेवत नाहीत म्हणून एपीडेमीक कायद्यांतर्गत ही कारवाई केली जाईल, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.