नाशिक- जिल्हा बँक शेतकऱ्यांना कर्ज देण्यास कोणत्याही कारणासाठी अडचण आणत असेल तर, अशा बँकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तसेच बियाण्यांची भेसळ करून विकणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करून सक्त कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी दिली.
दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त कृषी दिन कार्यक्रमाचे जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोंडे बोलत होते.
शेतकऱ्यांना कर्ज न दिल्यास बँकांवर कारवाई - अनिल बोंडे यावेळी बोलताना बोंडे म्हणाले, शेतकऱ्यांनी अधिकृत दुकानातूनच बियाणे-खते पावतीसह घ्यावीत. त्याबरोबरच प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाचा विमा काढावा.
शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेती करणे आवश्यक आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी जे शेतकऱ्यांचे गट एकत्र येतील त्यांना 1 ते 10 कोटी रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा शेतकऱ्यांनी घेऊन शेततळे बांधून शेती करावी, असे आवाहनही त्यांनी केले. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतमालाचा विमा काढावा, यासाठी विमा कंपन्यांचे अधिकारी जिल्हा अधीक्षक कार्यालयात थांबणार आहेत. तर यापुढे ते तालुक्याच्या ठिकाणी कृषी कार्यालयात बसतील, अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे बोंडे यांनी सांगितले.