नाशिक- राज्यात आज सर्वत्र विठू नामाचा गजर करत भक्त विठ्ठल भक्तीत तल्लीन झाल्याचे पाहायला मिळत आहे. कळवण शहराचे ग्रामदैवत असलेल्या व शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या प्रतिपंढरपूर श्री विठोबा महाराज मंदिरात आज आषाढी एकादशी निमित्ताने पहाटे ५ वाजेपासून दर्शनासाठी विठ्ठल भक्तांनी गर्दी केल्याने गांधी चौक परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
नाशिकमध्ये विठ्ठल नामाची शाळा; रांगोळी, बालदिंडी व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे वारकऱ्यांमध्ये चैतन्य - कळवण
नाशिक जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागात आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल भक्तांचा उत्साह शिगेला पोहचल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यात शाळकरी मुलांनी काढलेल्या दिंडीमुळे ठिकठिकाणी विठ्ठल नामाची शाळा भरली होती, तर कलावंतांनी रांगोळीच्या माध्यमातून विठूरायाचे रूप साकारले होते.

प्रत्येकालाच पंढरपूरात जाऊन विठू रायाच्या चरणी नतमस्तक होता येत नाही. त्यामुळे जवळपास असलेल्या विठ्ठल मंदिरात विठ्ठल भक्तांची मोठी गर्दी होत असते. आज नाशिक शहर आणि ग्रामीण भागात विठ्ठलाच्या मदिरांत भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी काही ठिकाणी शाळकरी मुलांनी काढलेल्या दिंडीमुळे ठिकठिकाणी विठ्ठल नामाची शाळा भरल्याचे चित्र दिसत होते. तर काही ठिकाणी कलावंतांनी रांगोळी माध्यमातून विठूरायाचे रूप साकारले होते.
नाशिकच्या येवल्यात देखील आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील इंग्लिश मिडीयम स्कूल मधील चिमुकल्या मुलांनी विठ्ठल रुक्मिणी यांची वेशभूषा करत शहरातून टाळ मृदुंगाच्या गजरात पायी दिंडी काढली. यावेळी नृत्य सादर करून नृत्याद्वारे या शालेय विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडीचा संदेश शहर वासीयांना दिला.