नाशिक -सोशल मीडियावर आपण एखाद्या खेडेगावातील समस्या सांगणारा फोटो पाहतो आणि हळहळ व्यक्त करतो. मात्र अशाच एका व्हायरल फोटोवरुन महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी थेट सरकारी अधिकाऱ्यांना आणि यंत्रणांना आदेश देत संबंधित गावामधील समस्या दूर तर केल्याच पण ज्या सेवा गावकऱ्यांना उपलब्ध करुन दिल्या त्याच्या उद्घाटनासाठी ते स्वत: हजर झाल्याचं पहायला मिळालं.महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज नाशिकमधील शेंद्रीपाडा या दुर्गम आदिवासी गावात एका पुलाचे (Aaditya Thackeray inaugurated a bridge in Shendripada) उद्घाटन केले, जिथे लोक आपला जीव धोक्यात घालून तात्पुरत्या बांबूचा पूल वापरत होते. गावातील नळपाणी प्रकल्पाचे उद्घाटनही आदित्य ठाकरे यांनी केले. त्यावेळी त्यांनी स्थानिक महिलांशी चर्चा केली.
शेंद्रीपाडा येथील महिलांना पाण्यासाठी जीवघेणा कसरत करावी लागत होती.लाकडावरून चालत जाऊन नदी पार करावी लागत होती. आदित्य ठाकरे यांनी महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. पाणी,लाईट व रस्ते समस्या सोडवण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
या घटनेवरून सोशल मीडियाची ताकद दिसून आली आहे. यापूर्वी आपण सोशल माध्यमावर अनेक फोटो व व्हायरल झाल्याचे पाहिले आहे. मात्र कालांतराने त्या घटना विस्मरणात गेलेल्याही पाहिल्या आहेत. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक हितकारी कार्य मार्गी लागल्याचेही आपण पाहिले आहे. अशीच समाज माध्यमातून लोकहितकारक घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे.
सोशल मीडियावर आपण एखाद्या खेडेगावातील समस्या सांगणारा फोटो पाहतो आणि हळहळ व्यक्त करतो. मात्र अशाच एका व्हायरल फोटोवरुन महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी थेट सरकारी अधिकाऱ्यांना आणि यंत्रणांना आदेश देत संबंधित गावामधील समस्या दूर तर केल्याच पण ज्या सेवा गावकऱ्यांना उपलब्ध करुन दिल्या त्याच्या उद्घाटनासाठी ते स्वत: हजर झाल्याचं पहायला मिळालं. आज आदित्य ठाकरेंच्या हस्ते नाशिकमधील दुर्गम भागात असणाऱ्या शेंद्रीपाडा या आदिवासींची लोकसंख्या अधिक असणाऱ्या गावामधील एका नदीवरील पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. शेंद्रीपाडा येथील गावकऱ्यांना आतापर्यंत बांबूच्या आधारे बांधलेल्या पूलावरुन जीव मुठीत घेऊन नदी ओलांडावी लागायची. बांबूंवरुन नदी ओलांडत डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन जाणाऱ्या महिलांचे फोटो पाहून आदित्य ठाकरेंच्या आदेशानंतर सूत्र फिरली आणि तीन महिन्यात गावातील पूलाची आणि पिण्याच्या पाण्याची समस्या सुटलीय.
शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करतांना शहरांसोबतच खेडी व वाड्या-पाड्यांचा विकास केला जाईल. जलजीवन मिशनच्या माध्यमातून पुढील तीन महिन्यात जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील वाड्या-पाड्यांपर्यंत पाणी पोहचवणार असल्याचे राज्याचे राजशिष्टाचार, पर्यावरण, वातावरणीय बदल व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले. आज त्र्यंबकेश्वर येथील दूर्गम भागात लोकसहभागातून साकारलेल्या सावरपाडा व सेंद्रीपाडा यांना जोडणाऱ्या लोखंडी पुलाची पाहणी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, आज प्रसार माध्यम संस्थांकडून या भागातील समस्या माझ्यापर्यंत पोहचल्या आहेत. या भागात पाऊस जास्त पडतो, परंतु पाणी साठवणीसाठी योग्य उपाययोजना नसल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईचा प्रश्न येथील भागात जास्त भेडसावतो. आज प्रत्यक्ष भेटीतून या भागातील लोकांच्या समस्या जास्त जवळून जाणून घेता आल्या. या आदिवासी भागात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दूर्गम भागात डोक्यावर हंडी घेऊन पायपीट करावी लागते. जलजीवन योजनेच्या माध्यमातून येत्या तीन महिन्यांत या वाड्या-पाड्यातील प्रत्येक घराच्या दारापर्यंत आपण पाणी पोहवणार असल्याची ग्वाही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिली आहे. आदिवासी वाड्या- पाड्यातील ग्रामस्थांची नाळ ही पर्यावरणाशी जोडली गेली आहे,त्यामुळे आदिवासी वाड्या-पाड्यांचे जतन करणे हे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. शेतीला प्राधान्य देवून आदिवासी वाड्या-पाड्यात रस्ते, वीज व पाणी या मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच या भागात पर्यटन विकासाच्या दृष्टीने शासनस्तरावर नक्कीच प्रयत्न करणार असल्याचेही पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राज्याचे कृषीमंत्री तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, सर्वश्री आमदार हिरामण खोसकर, नरेंद्र दराडे, सुहास कांदे, माजी आमदार वसंत गिते, निर्मला गावीत, काशिनाथ मेंगाळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, इगतपुरी-त्र्यंबक उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपअभियंता, प्रादेशिक व्यवस्थापक महेश बागुल, नगरसेवक सुधाकर बडगुजर, सेंद्रीपाडाचे सरपंच विठ्ठल दळवी आदी यावेळी उपस्थित होते.
कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विकास साधणार -
मागील दीड वर्षापूर्वी 01 जुलै 2020 रोजी याच भागातील साप्ते कोने या आदिवासी पाड्यातून कृषीदिन सप्ताहाची सुरुवात करण्यात आली होती. आदिवासी भागाच्या विकासासाठी कृषी विभागाच्या योजनांच्या माध्यमातून सतत प्रयत्न करणार असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज केले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले आहे, परंतु पाणी साठवण बंधारे, शेततळी या भागात तयार केल्यास निश्चितच त्याचा उपयोग आदिवासी बांधवांना शेतीसाठी होईल.आदिवासी बांधवांनी कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी केले.