दिंडोरी (नाशिक ) -नाशिक दिंडोरी वणी रस्त्यावर एकाच तासात 9 वाहनांचा घसरून अपघात झाल्याची घटना घडली आहे. थोडा पाऊस होताच या रस्त्यांवर वाहनांची घसरगुंडी सुरु होते आज थोडा पाऊस झाल्यामुळे पुन्हा या रस्त्यावर वाहनाची विचित्र घसरगुंडीचे सत्र पाहण्यास मिळाले. त्यामुळे रसत्याच्या कामाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
सहा वाहनांचे अपघात
मागील वेळेससुद्धा याच ठिकाणी एकाच दिवसात जवळ जवळ सहा वाहनांचे विचित्र अपघात झाले होते. अजून चांगल्या पावसाला सुरुवात सुध्दा झालेले नाही. हलक्या पावसाने जर एवढे अपघात होत असतील तर दिवसभराचा पाऊस पडल्यास किती अपघात होतील याचे गणित न केलेले बरे,रणतळे येथील उतार तर अपघात प्रवण क्षेत्र बनले असून पाऊस होताच गाड्या घसरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील महिनाभरात दोन ट्रक घसरून त्याखाली दोन चालक दबले गेले होते. त्यांना वाचविण्यात पोलिसाना यश आले होते.
रस्त्याच्या कामाबाबत शंका
दिंडोरी अक्राळे फाटा रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले. जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तेव्हा केवळ दिंडोरी ते अक्राळे फाटा व दिंडोरी ते वणीपर्यंत अनेक वाहने घसरून पडतात. आजही पाऊस पडल्यानंतर किमान 9 वाहने घसरून पडली. त्यामुळे रस्त्याच्या कामाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.