नाशिक - नाशिकमधील अंबड परिसरात मंगळवारी (5 मे) मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या बिबट्याने एका दुचाकीला धडक दिल्यामुळे एकजण जखमीही झाला आहे.
नाशिकच्या अंबड परिसरात पुन्हा बिबट्या दिसला बिबट्याच्या धडकेत एक तरुण जखमी
काही दिवसांपूर्वी गंगापूर रोड परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अंबड परिसरात बिबट्या दिसला. मुक्त संचार करत असताना तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यावेळी या बिबट्याने शुभम गायकवाडच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये शुभम दुचाकीवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला आहे.
पुन्हा बिबट्या दिसल्याने शहरात घबराटीचे वातावरण
घटनेची माहिती मिळताच शुभम गायकवाड याच्या काही मित्रांनी शुभमला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. या बिबट्याने पांडवलेणीच्या जंगलामध्ये पलायन केल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या रात्र गस्ती पथकाने या बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्या पळून गेला. दरम्यान, नागरी वस्तीमध्ये पुन्हा एकदा बिबट्या आढळून आल्याने शहरभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा -लॉकडाऊन - देहविक्री करणाऱ्या महिला, तृतीयपंथीयांना मुंबई पालिकेकडून अन्नधान्याचे वाटप
हेही वाचा -पाहा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते