नाशिक - इगतपुरी तालुक्यातील एका बिबट्याने एका महिन्यात दोन वृद्ध व्यक्ती व दोन बालकांचा बळी घेतल्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने ठिकठिकाणी पिंजरे लावले होते. दरम्यान, काल मध्यरात्री पिंपळगाव मोर भागात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला आहे. याच बिबट्याने परिसरातील नागरिकांना ठार केल्याचा संशय वनअधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
बिबट्याची डीएनए चाचणी होणार
इगतपुरी तालुक्यातील चिंचलाखैर, कतरुवणग, पिंपळगाव मोर आणि अधारवाडी या गावात गेल्या महिनाभरापासून बिबट्याची दहशत होती. या गावांमध्ये बिबट्याने एक वृद्ध पुरुष, एक वृद्ध महिला आणि दोन मुलांवर हल्ला करत त्यांचा बळी घेतला होता. त्यामुळे, आम्ही या भागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबत पिंजरे लावले होते. अनेकदा हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला, मात्र पिंजरा लावलेल्या ठिकाणी तो फिरकत नसल्याचे आढळून आले.