इगतपुरी (नाशिक) - तालुक्यातील नांदगावसदो गावातील डोंगराच्या पायथ्याजवळ असलेल्या एका मोकळ्या घरात बिबट्याचे चार बछडे सापडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हे घर राजेंद्र तांदळे यांच्या मालकीचे आहे.
नाशिक : एका मोकळ्या घरात आढळले बिबट्याचे चार बछडे - नाशिक बातमी
इगतपुरी तालुक्याच्या नांदगावसदो या गावातील एका मोकळ्या घरात बिबट्याचे चार बछडे सापडल्याने खळबळ उडाली आहे. हे बछडे 15 दिवसांचे असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे.
हे घर शेतात असून शेती कामे आटोपून ते गावातील घरात जातात. मात्र, 15 ऑगस्टला राजेंद्र तांदळे शेती कामाचे आवजार, साहित्य घेण्यासाठी शेतातील घरात आले असता सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांना काही अंतरावर बिबट्या दिसला. तेव्हा त्यांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर रविवारी (दि. 16 ऑगस्ट) दुपारी पुन्हा शेतीच्या कामासाठी लागणारे अवजार घेण्यासाठी ते घरी गेले असता त्यांना बिबट्याचे चार बछडे दिसले. याबाबत त्यांनी वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होत. त्यांनी परिसरातील पहाणी करुन घराच्या आसपास पाहणी केली. तसेच या भागात काम करणाऱ्या शेत मजुरांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पावसामुळे मादीने बछडे सोडले घरात
इगतपुरी तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने मादी बिबट्याने पावसापासून बचाव करण्यासाठी हे बछडे या घरात आणून ठेवले असतील, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. तसेच या परिसरात बिबट्याच्या पंजाच्या खुणा आढळून आल्याने तिचा वावर अनेक दिवसांपासून असून बिबट्याचे 15 दिवसांचे आहे, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली.