नाशिक - मालेगावच्या दाभाडी येथील प्रयोगशील शेतकरी महेंद्र निकम यांनी आपल्या शेतात जांभळ्या व पिवळ्या रंगाच्या फुलकोबी (फ्लॉवर) पिकाचे उत्पादन घेतले आहे. निकम यांचा हा राज्यातील पहिला प्रयोग ठरला असून जिल्हाभरात ह्या रंगीबेरंगी फुलकोबीची चर्चा आहे. कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते रविवारी या पिकाच्या काढणीला सुरुवात करण्यात आली. विदेशात संशोधन झालेल्या या पिकात अधिक पोषक द्रव्ये असतात.
नाशिकच्या दाभाडे गावात शेतकऱ्याने शेतात जांभळ्या आणि पिवळ्या रंगाच्या फुलकोबीचे उत्पादन घेतले मेट्रो सिटी व मोठ्या मॉलमध्ये मागणी -
राज्यात फक्त पांढऱ्या व हिरव्या फुलकोबीचे उत्पादन घेतले जाते. मात्र, या कोबीला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने निकम यांनी शेतात कोरंटीना आणि व्हॅलेंटिना जातीच्या पिवळ्या व जांभळ्या रंगाच्या फुलकोबीचे उत्पादन घेतले. या फुलकोबीत अधिक पोषकद्रव्ये आहेत. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर निकम यांनी फुलकोबीची लागवड केली. निकम यांंना पीक काढणीपर्यंत एकरी जवळपास 20 हजार रुपये खर्च आला आहे. त्याची पोषण क्षमता चांगली असल्यामुळे मेट्रो सिटी व मोठ्या मॉलमध्ये त्याला मागणी आहे. साधारणता शंभर रुपये किलो भाव निकम यांना अपेक्षित आहे. राज्यात हा पहिलाच प्रयोग असल्याने रंगीबेरंगी फुल कोबीला चांगली मागणी मिळेल, असा विश्वास महेंद्र निकम यांना आहे.
पारंपरिक शेतीला फाटा देत केली रंगीत फुलकोबीची शेती -
आम्ही सुरुवातीला पारंपरिक शेती करत होतो. त्यानंतर डाळिंब, शेवगा ,पपई अशी उभी पिके घेतली. माझा मुलगा प्रयोगशील शेतकरी आहे. त्याने प्रथमच आमच्या शेतात रंगीबेरंगी फुल कोबीची लागवड केली. त्याला आम्ही कुटुंब म्हणून नेहमीच मदत करतो. त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांनाही याबाबतची माहिती देतो. पारंपरिक शेतीला फाटा देत शेतीतून उत्पन्न कसे मिळवता येईल यासाठी माझा मुलगा कायम प्रयत्न करत असतो. आम्हाला आमच्या मुलाच्या कामाचा अभिमान आहे, असे महेंद्र यांचे वडील दिलीप निकम म्हणाले.
'पिकेल ते विकेल ' या योजनेतर्गंत स्टॉल उपलब्ध करून देऊ -
महेंद्र निकम यांच्या या रंगीबेरंगी फुलकोबी प्रयोगाची राज्याच्या कृषिमंत्र्यांनीही दखल घेतली आहे. मंत्री भुसे यांनी शेतकरी निकम यांच्या या फुलकोबी उत्पादन प्लॉटला भेट देऊन नवीन प्रयोगाची पाहणी केली. भुसे यांचे हस्ते फुलकोबी काढणीचा शुभारंभ देखील करण्यात आला. राज्य शासनाच्या 'पिकेल ते विकेल' या योजनेंतर्गत नाशिक व ठाणे येथे जांभळ्या व पिवळ्या फुलकोबीसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन भुसे यांनी उत्पादक निकम यांना दिले आहे. रंगीत फुलकोबीचा हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी राज्य पातळीवर दिशादर्शक ठरणार आहे, असेही कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.