नाशिक- शहरात काही बांधकाम व्यावसायिकांनी नैसर्गिक नाल्यांवर नाधिकृतपणे बांधकाम करून इमारती उभारल्या आहेत. त्यामुळे, आता पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसत असल्याने या बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेविका कल्पना पांडे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी थेट स्थायी समितीच्या सभेत ठिय्या आंदोलन केले असून यावर खुलासा मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा दिला आहे.
आज नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेला अनेक नगरसेवकांनी ऑनलाइन हजेरी लावली, तर अनेकांनी प्रत्यक्ष सभेच्या दालनात उपस्थित राहण्यास पसंती दिली. विविध विकासकामांच्या विषयावर चर्चा सुरू असताना आपल्या प्रभागात अनेक नैसर्गिक नाले बुजवून त्यावर बांधकाम व्यावसायिकांनी इमारती बांधल्याने पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसत असल्याचे सांगत अशा बेकायदेशीर बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी पांडे यांनी केली.