नाशिक - नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येवला प्रांताधिकारी सोपान कासार (Sopan Kasar) यांनी शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप एका पीडित तलाठी महिलेने केला आहे. तर, दुसऱ्या एका तलाठी महिलेने 60 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप प्रांत कासार यांच्यावर केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या दोन्ही तलाठी महिलांनी मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे प्रांताधिकाऱ्याकडून महिलांना बदलीची धमकी देण्यात आली आहे. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ (Nashik Guardian Minister Chhagan Bhujbal) यांना या महिलांनी निवेदन देत आपली व्यथा मांडली आहे. याबाबत येवला पोलीस ठाण्यात प्रांत अधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महिला तलाठी मॅट कोर्टामध्ये (MAT Court) जाऊन बदलीला स्थगिती घेऊन आलेल्या आहेत.
पहिल्या तलाठी महिलेचा आरोप
'मी येवला येथील एका गावातील तलाठी महिला आहे. एका नोटीसीचा खुलासा देण्याबाबत येवला प्रांताधिकारी सोपान कासार यांच्याकडे गेली होती. त्यांनी मला बराच वेळ ऑफिस बाहेर बसून ठवले. नंतर त्यांनी मला फोन करून घरी भेटण्यास बोलवले. मी घरी गेल्यानंतर त्यांनी या ना त्या कारणाने माझा हात पकडला व माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तू मला सहकार्य कर, मी तुला सर्व ती मदत करतो, असं त्यानी म्हटलं. पण मी त्याला विरोध करत तिथून निघून गेली. नंतर कासार यांनी मला त्रास देण्यासाठी वेगळ्या पद्धतीने नोटीसा पाठवत माझी नांदगाव येथील दुर्गम भागात बदली केली', अशी तक्रार एका तलाठी महिलेने केला आहे.
दुसऱ्या तलाठी महिलेकडे 60 हजारांची मागणी
येवला तालुक्यातील दुसऱ्या तलाठी महिलेने प्रांताधिकारी सोपान कासार यांच्यावर आरोप केला आहे. 'दप्तर तपासताना मी चुका काढू शकतो. म्हणून मला 60 हजार रुपये द्या, अशी मागणी कासार यांनी केली. मी घाबरून 60 हजार रुपये दिले. मात्र प्रांताधिकाऱ्यांची अपेक्षा वाढत गेली. त्यामुळे मी वरीष्ठांकडे तक्रार केली', असे दुसऱ्या तलाठी महिलेने म्हटले आहे.