नाशिक- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढून नाशिक जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांत कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था व्हावी, या साठी पहिल्या टप्प्यात ९ रुग्णालयांमधील ऑक्सिजन जनरेशन प्लांटला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १० कोटी ८८ लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील बहुतांश रुग्णालयात स्वतःचा ऑक्सिजन प्लांट निर्माण होऊन ऑक्सिजनचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना मिळालेले हे यश आहे.
जिल्हा रुग्णालयासह ९ रुग्णालयात होणार ऑक्सिजन जनरेशन प्लांट..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शासकीय रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या होत्या. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन बेड्सची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र सद्या लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यातील ४ उपजिल्हा रुग्णालय व ४ ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती करण्यात यावी, असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १० रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती करण्यासाठी १० कोटी ८८ लाख रुपयांच्या या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
महिन्याभरात ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित होणार..