नाशिक- करंजाच्या झाडाच्या बिया गोळा करून त्या विकायच्या. त्यामधून दोन पैसे कमवायचे. मात्र, लॉकडाऊन सुरू झाल्याने बिया देखील विकू शकत नाही. त्यामुळे जवळ पैसा नाही आणि घरात खायला अन्नही नाही. त्यामुळे जगावं कसं? असा प्रश्न जंयता कडाळे या ८० वर्षाच्या वृद्ध महिलेला पडला आहे. त्यांची व्यथा सांगताना त्यांना रडू कोसळले.
करंजाच्या बिया विकून दोन पैसे मिळायचे; पण लॉकडाऊनमुळे तेही बंद झाले, ८० वर्षाच्या वृद्धेची व्यथा - नाशिक कोरोना अपडेट
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी लहान व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी येथील जयंता कठाळे ही आदिवासी समाजातील वृद्ध महिला आहे. त्यांची दोन्ही मुले आणि पतीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांना कोणाचाही आधार नाही. स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी त्या गेल्या अनेक दिवसांपासून करंजाच्या बिया गोळा करण्याचे काम करतात. त्या बियांमधील गाभा काढून ते भूसारचे व्यापाऱ्यांना विकत असतात. त्यामधून त्यांना चार पैसे मिळतात. मात्र, गेल्या एक महिन्यापासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे त्या बिया देखील विकू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 'नवराही मेला, दोन पोरंही नेली अन् देवानं मला कशाला ठेवलं?', असे सांगताना त्यांना रडू कोसळले.