नाशिक -शहर परिसरात पोलीस असल्याचे भासवून माल वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना अडवून वसुली करणारे दोन सराईत सोनसाखळी चोरटे असल्याचे पंचवटी पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यांच्याकडून ८ गुन्ह्यातील २२३ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे.
तोतया पोलीस निघाले सोनसाखळी चोर अक्षय सदाशिव दोंदे (वय २१) आणि भूषण अरुण जाधव (वय २२) असे दोन्ही सोनसाखळी चोरट्यांची नावे आहेत. तसेच ते दोघेही तलाठी कॉलनीतील शिवनगर येथील रहिवासी आहे. औरंगाबाद मार्गावर गुरुवारी भरदिवसा ट्रक अडवून वसुली करताना पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.
हे वाचलं का? - चंद्रपूर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याची हत्या प्रकरण; मुलानेच केली वडिलाची हत्या
पोलीस तपासात संशयितांनी शहरात तब्बल १० ठिकाणी सोनसाखळी चोरल्याची कबुली दिली. दोघांच्या ताब्यातून १० पैकी आठ गुन्ह्यांतील ८ लाख ६६ हजार रुपये किंमतीचे २३३ ग्रॅम सोने हस्तगत केले आहे. याशिवाय गुन्ह्यात वापरलेल्या एक लाख ७० हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. इंदिरानगर आणि भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या दोन घटनांमधील सोने हस्तगत करणे बाकी आहे.
दरम्यान, हे संशयित ओळखीच्या व्यक्तीकडून काही वेळासाठी दुचाकी घ्यायचे. त्यानंतर नंबर प्लेट बदलून चोरी करायचे. उच्च शिक्षण अर्धवट सोडून संशयितांनी हा उद्योग सुरू केला होता. पोलीस दलात नातेवाईक असल्याने त्यांना बंदोबस्ताची माहिती होती. सर्व गुन्हे संशयितांनी व्हीव्हीआयपी नेत्यांच्या दौऱ्याप्रसंगी केले आहेत. त्यामुळे पोलिसांना टिकेला सामोरे जावे लागत होते. मात्र, आता त्यांच्याकडून पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील ३, म्हसरूळ हद्दीतील ३, गंगापूरमधील १, तर इंदिरानगर आणि भद्रकाली हद्दीतील अनुक्रमे २ आणि १ असे १० गुन्हे उघडकीस आले आहेत. याबाबत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.