नाशिक -
नाशिक विभागात मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या 73 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, यामुळे काही प्रमाणात बळीराजा सुखावला आहे. पावसासाठी मराठवाड्यात सरकार कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याच्या तयारीत आहे. परंतु, यावर्षीच्या जून आणि जुलै महिन्यात नाशिक विभागात 178 मिलिमीटर पाऊस झाला आहे. सरासरी 211 मिली मीटर पेक्षा हा आकडा कमी असला, तरीही या भागात मुबलक जलसंचय झाल्याने नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव भागात 73 टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
मात्र, धुळे जिल्हा सर्वाधिक कमी पावसाची नोंद झाली असून, येथील शेतकरी अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. कोकण आणि नाशिक विभाग वगळता महाराष्ट्राच्या इतर भागात पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. नाशिक विभागात 21 लाख 83 हेक्टर लागवड क्षेत्र असून आपर्यंत 15 लाख 90 हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण झाली आहे. नाशिक विभाग सर्वाधिक मका, बाजरी, सोयाबीन, नागली व भाताचे लागवड क्षेत्र आहे.